धरमशाला – लियाम लिव्हिंगस्टोनची जिद्दी खेळी व अथर्व तायडेच्या अर्धशतकानंतरही पंजाब किंग्जला बुधवारी आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून 15 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. अर्थात या सामन्यात विजय व पराजय झालेले दिल्ली व पंजाब या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. त्यानंतर अथर्व तायडनेने प्रभसिमरन सिंगसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र, प्रभसिमरन सिंग 22 धावांवर बाद झाला. अथर्व तायडेने अर्धशतक पूर्ण करताना लिव्हिंगस्टोनच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. या वेळी अचानक तायडेने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तायडेने आपल्या 55 धावांच्या खेळीत 42 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावले. ही कृती एक नवी रणनिती म्हणून परिचित होताना दिसत आहे. भरात असलेला जीतेश शर्मा फलंदाजीला आला. मात्र, ही खेळी फसली व शर्मा खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या शाहरुख खान लगेचच बाद झाला. दरम्यान, लिव्हिंगस्टोनने आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी सॅम कुरेनही 11 धावा काढून परतला. हरप्रीत ब्रारनेही निराशा केली. अखेरच्या षटकात लिव्हिंगस्टोन स्ट्राईकवर होता व त्यांना 6 चेंडूत 33 धावांची गरज होती. त्याने स्ट्राईक राखला. मात्र, अखेरच्या चेंडूवर तो 94 धावांवर बाद झाला व त्याचे शतक हुकले.
तत्पूर्वी, रेली रोसो, पृथ्वी शॉ व कर्णधार डेव्हीड वॉर्नर यांच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 2 गडी गमावून 213 धावा अशी मजल मारली. रोसोने वादळी फलंदाजी केल्यामुळेच दिल्लीला संघाची धावसंख्या द्विशतकी पार उभारता आली.
पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकत दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजी दिली. या सामन्याद्वारे संघात परतलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉने कर्णधार डेव्हीड वॉर्नरसह संघाला 94 धावांची दमदार सलामी दिली. अर्धशतकाजवळ आलेला वॉर्नर 46 धावांवर परतला. त्याने या खेळीत 31 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर पृथ्वीने रेली रोसोच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. या जोडीने संघाला दीडशतकी धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, अनावश्यक फटकेबाजी करत असलेला पृथ्वी शॉ 54 धावांवर परतला. त्याने या खेळीत 38 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार फटकावला. रोसोनेही थाटात अर्धशतक पूर्ण केले. त्याने फिलिप सॉल्टच्या साथीत अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या द्विशतकी धावा फलकावर लावल्या.
या जोडीने अखेरच्या पाच षटकांत तब्बल 65 धावांची वसुली केली. रोसोने नाबाद 82 धावांची खेळी केली व त्यात 37 चेंडूत 6 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. सॉल्टनेही तुल्यबळ साथ नाबाद 14 चेंडूत 2 चौकार व 2 षटकरांच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या. पंजाबकडून सॅम कुरेननेच दोन्ही बळी घेतले.
लक्षवेधी
डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक हुकले
पृथ्वी शॉबरोबर
भक्कम सलामी
पृथ्वी शॉचे अर्धशतक
रेली रोसोची 82 धावांची वादळी खेळी
फिलिप सॉल्टसह महत्त्वपूर्ण भागीदारी
दिल्लीच्या डावात 20 चौकार व 11 षटकार
धवनचा भोपळा
अर्धशतकानंतर
तायडे निवृत्त बाद
लिव्हिंगस्टोनचे
शतक हुकले
जिद्दी खेळीनंतरही पंजाब पराभूत
दिल्ली व पंजाब स्पर्धेबाहेर
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 2 बाद 213 धावा. (डेव्हीड वॉर्नर 46, पृथ्वी शॉ 54, रेली रोसो नाबाद 82, फिलिप सॉल्ट नाबाद 26, सॅम कुरेन 2-36).
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 8 बाद 198 धावा. (प्रभसिमरन सिंग 22, अथर्व तायडे निवृत्त बाद 55, लियाम लिव्हिंगस्टोन 94, ईशांत शर्मा 2-36, अनरीच नोर्जे 2-36).