पिंपरी – वास्तू मनासारखी झाली की, त्याचा आनंद वेगळाच असतो. त्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असते. त्याचप्रमाणे नेहरूनगर येथील न्यायालयाचे काम करणाऱ्या सर्वांना एकत्र येऊन सर्वस्व देऊन काम केल्यास या न्यायालयाचे राज्यभरात नाव होईल, असा विश्वास जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड न्यायालयाचे मोरवाडी येथून नेहरूनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या हस्ते बुधवारी (दि. 17) नेहरूनगर येथील नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक बोलत होते. या वेळी पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे, न्यायाधीश एन. आर. गजभिये, न्यायाधीश आर. एम. गिरी, न्यायाधीश एम. जी. मोरे, न्यायाधीश पी. सी. फटाले, न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ऍड. जयश्री कुटे, सचिव ऍड. गणेश शिंदे, महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे, सह सचिव ऍड. मंगेश नढे, खजिनदार ऍड. विश्वेश्वर काळजे, हिशोब तपासणीस ऍड. राजेश रणपिसे, सदस्य ऍड. अक्षय केदार, ऍड. स्वप्नील वाळुंज, ऍड. सौरभ जगताप, ऍड. नितीन पवार, ऍड. प्रशांत बचुटे,सऍड. पवन गायकवाड, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील आजी, माजी पदाधिकारी आणि वकील बांधव तसेच महापालकिचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक म्हणाले की, प्रत्येक गोष्ट करताना अनेक अडचणी येत असतात. त्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. प्रत्येक गोष्ट लगेच होत नाही. त्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवून त्या मार्गी लावल्या जातील. कोणतीही गोष्ट पेपरवर रहाणार नाही. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक म्हणाले की, या पूर्वीच्या जागेत अनेक अडचणी होत्या. त्या सोडवत काम केले आहे. आता मोठी जागा असली तरी काही अडचणी आहेत. प्रत्येकाने सकारात्मक विचार केल्यास त्या अडचणींवर मात करून काम होईल. आनंदाचे क्षण आहेत. ते जगत काम करावे. अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले की, न्यायालयास महापालिकेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात येतील. प्रमुख प्रश्न पार्किंगचा आहे. तो सोडविण्यात आला आहे. तसेच पुढे ही जागा वाढविण्याची सोय करण्यात आली आहे. न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेत नवीन इमारतीची सर्व माहिती दिली. प्रथममर्ग न्यायाधीश एम. जी. मोरे यांनी सूत्रसंचालन केले. महिला सचिव ऍड. प्रमिला गाडे यांनी आभार मानले. नव्या इमारतीतील सुविधा नव्या इमारतीमध्ये एकूण 11 कोर्ट आहेत. त्यामध्ये न्यायाधीशांचे अँटी चेंबर, स्टेनो रूम, इतर न्यायालयीन कामकाजासाठी कार्यालये आहेत. न्यायाधीशांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, फायर फायटिंग सिस्टीम, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र जिना अशा सुविधा आहेत. तळमजल्यावर दोन कोर्ट रूम, कॅन्टीन, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तुरुंग व्यवस्था, हिरकणी कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष आहे. पहिल्या मजल्यावर दोन कोर्ट रूम, दस्तऐवज कक्ष, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम, फौजदारी व दिवाणी कागदपत्रांचे कक्ष, सिव्हिल स्ट्रॉंग रूम, सर्व्हर कक्ष, झेरॉक्स रूम, मुद्देमाल कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर सात कोर्ट रूम, कार्यालय, एरिया पीपी रूम, झेरॉक्स रूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. 384 दुचाकी, 69 चारचाकींसाठी पार्किंगची सोय मोरवाडी येथून पाच दिवाणी न्यायालयांचे स्थलांतर झाले आहे. त्यानंतर परवानगी मिळताच आणखी सहा न्यायालयांचेही कामकाज सुरू होणार आहे. त्यानंतर नेहरूनगर येथील इमारतीत एक सत्र न्यायालय, दोन उच्चस्तरीय न्यायालये आणि आठ प्रथमवर्ग न्यायदंधिकारी (न्यायालय) यांचे कामकाज होणार आहे. येथे येणाऱ्यांना पार्किंगसाठी सोय म्हणून तळघरात 147 दुचाकी आणि 35 चारचाकी, तळमजल्यावर 150 दुचाकी, पहिल्या मजल्यावर 27 दुचाकी, 26 चारचाकी आणि दुसऱ्या मजल्यावर 60 दुचाकी आणि आठ चारचाकी अशा एकूण 384 दुचाकी व 69 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध आहे. गरज पडल्यास पार्किंगची जागा वाढविण्यासाची सुविधा आहे.