होय, मी एचआयव्हीबद्दल बोलतोय…!

एड्स (म्हणजे ‘अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम’) एच.आय.व्ही. (ह्युमन इम्यूनो डिफिशियेंसी व्हायरस) विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक स्थिती आहे. एचआयव्ही झालेल्या व्यक्तीला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. 

एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एचआयव्हीसहित जगणाऱ्या रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होणे शक्य असते. त्यांवर इलाज करणेही अवघड होते. एचआयव्ही संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एचआयव्हीसहित जगणारी व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते.
एचआयव्ही यापैकी कोणत्याही कारणाने संक्रमित होऊ शकतो –
१) असुरक्षित लैंगिक संबंधातुन
२) दूषित रक्त चढवल्याने
३) संसर्गित आईकडून अर्भकाला
४) एचआयव्हीसहित जगणाऱ्या आईकडून स्तनपान करणार्‍या बाळाला
५) दूषित सुईतून (इंजेक्शनद्वारे ड्रग्स घेताना)

एचआयव्हीविषयी अनेक समजगैरसमज समाजात पसरलेले असतात. एचआयव्ही संसर्गजन्य नाही. तो फक्त रक्ताचा रक्ताशी संबंध आला तरच होतो.हा व्हायरस अतिशय नाजूक असतो. त्याचा हवेशी संबंध आल्यास तो मृत होतो. एचआयव्हीसहित जगणाऱ्या व्यक्तीचे कपडे आणि वस्तू वापरल्याने हा रोग पसरत नाही. साबणाशी किंवा फेसवॉश आणि शेविंग क्रिमशी ह्या व्हायरसचा संबंध आला तरी तो मरतो. एकमेकांचे साबण वापरल्यानेदेखील एचआयव्हीचा प्रसार होत नाही. आपल्या लाळेतीळ लाळग्रंथी (Saliva Glands) यांमध्ये उपलब्ध असणारा लायसोझोन नावाचा घटक मोठमोठ्या आजारांच्या विषाणूंचा आणि जिवाणूंचा नाश करतो. आपल्या प्रिय व्यक्तीचे बोट कापल्यास बालपणी ते बोट तोंडात घेऊन रक्त पिण्याची सवय असते या कारणाने देखील एचआयव्हीची लागण होत नाही. तसेच एकत्र एका ताटात जेवल्याने किंवा चुंबण घेतल्यानेसुद्धा ह्या व्हायरसचा प्रसार होत नाही.

वरील कारणांपैकी बहुतांश लोकांना एचआयव्हीची लागण असुरक्षित लैंगिक संबंधातून (सेक्स) होतो. म्हणून एचआयव्हीसहित जगणाऱ्या व्यक्तीकडे बघताना नकळत लोकांच्या डोळयांवर एक नैतिकतेचा चष्मा चढत असतो. यामुळे आपला आजार सर्वांपुढे येऊ नये असे त्या रूग्णालाही वाटत असते. समाजाचा दृष्टीकोन आणि रुग्णांची भीती यामुळे एचआयव्ही संक्रमण झाल्याचे निदान झाल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया निराशेची, भीतीची आणि रोग लपवण्याची होते. डॉ. एडॉल्फ मेयर या मानसशास्त्रज्ञांचं एक वाक्य एचआयव्हीचे अगदी चोख वर्णन करते. ‘मानवी साद-प्रतिसादांच्या अनंत पैलूंनीच एखाद्या आजाराला आजारपण प्राप्त होत असते’.

आपला देश पुरूषप्रधान संस्कृतीचा असल्यामुळे स्त्रीचे सामाजिक स्थान पुरूषांपेक्षा कमी महत्वाचे समजले जाते, त्यातून स्त्रियांनी लैगिक विषयावर चर्चा करणे गैर समजले जाते, त्यामुळे या परिस्थितीत ‍स्त्रीला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक या सर्व समस्यांचा सामना करावा लागतो. पुरूष एचआयव्हीबाधित असल्यास त्याला कुटुंबाकडून मानसिक व आर्थिक आधार मिळतो, परंतु त्या तुलनेत स्त्रीला पक्षपात सहन करावा लागतो. स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री व पुरूष समाजाचे सारखेच महत्त्वाचे घटक आहेत हे लहानपणापासूनच मनावर बिंबवले पाहिजे. जनजागृती केली पाहीजे. स्त्रियांनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे.

भारत सरकारने एड्स रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘एचआयव्ही आणि एड्स’ नियंत्रण कार्यक्रमाची आखणी केली आहे. सर्व पातळीर जनजागरण मोहिम, समुपदेशन, मार्गदर्शन, उपचार, आरोग्याबद्दल शिक्षण, मा‍नसिक व सामाजिक आधार, प्रसारावर देखरेख याची अंमलबजावणी चालू आहे.

सद्यभारताच्या युवकयुवतींना एचआयव्हीबद्दल जागरूक होणं अत्यंत गरजेची बाब आहे. प्रेम करावं, पण सेक्स करताना आपले आणि आपल्या जोडीदाराच्या काळजीचे प्रत्येकवेळी अतिशय काटेकोरपणे पालन करायला हवे. एचआयव्हीबद्दल स्वतः जागरूक होऊन एचआयव्हीसहित जगणाऱ्या लोकांनाही सामाजिक जाणिवेतून आधार देणं तितकंच महत्वाचं आहे. आज भारतातील प्रत्येक एआरटी केंद्रामध्ये रुग्णांची रांग तोंड झाकून एआरटीच्या गोळ्या घेताना दिसतात. त्यांना स्वतःला का लपवावं लागतंय याचा अभ्यास केल्यास आपल्या समाजातील एचआयव्ही आणि एड्सकडे संकुचित भावनेने बघणारा वर्ग कारणीभूत असल्याचं दिसून येतंय.

प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या कुटुंबासोबत जगण्याचा अधिकार असतो. एचआयव्हीसहित जगणं हा एक मोठा संघर्ष त्यांच्या जीवनात असतो, त्यांना तिरस्काराची वागणूक देऊन, त्यांचा रागराग करून, थट्टा करून किंवा घराबाहेर हाकलून त्यांची विटंबना करून त्यांच्या संघर्षात आणखी भर घालून त्यांच्यावर आत्महत्येची वेळ तरी आणू नका. एचआयव्हीविषयी आपल्या समाजात सकारात्मक भावना निर्माण झाली तर एचआयव्ही रुग्णांसाठी निवासी प्रकल्प उभारण्याची गरज पडणार नाही.

निमीत्ताने मला एक प्रसंग इथं वाचकांना सांगावा वाटतो. माझ्या एका मित्राचे वडील एड्सने गेले, प्रसंगी अक्षरशः मयतीला आलेले लोक मयतीपासून ५० फूट दूर बसलेले होते आणि कुणीही त्यांना खांदा दिला नाही शेवटी बैलगाडीतून मयत न्यावी लागली. म्हणजे अजूनही एचआयव्ही आणि एड्सविषयीचे गैरसमज व अंधश्रद्धा लोकांच्या मनात खोलवर रुजल्या गेलेल्या आहेत.

जामखेडच्या रत्नमालाताई जाधव यांनी आपल्या पतीला आणि चार वर्षाच्या लेकराला एड्समुळं गमावलं. स्वतःच्या आईवडिलांनी जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केलेली एचआयव्हीसह जीवनाचा संघर्ष करणारी ही आपली ताई आज आंतरराष्ट्रीय पातळीवर व्याख्यानं करून एचआयव्ही तसेच एड्सविषयी जनजागृती करतेय.

एचआयव्हीसंबधी काम करताना काही महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करून आम्हाला निदर्शनास आलेल्या बाबी लक्षात आल्या –
१) बऱ्याच एआरटी केंद्रांमध्ये रुग्णांना एआरटी स्टाफकडून अरेरावीपणा सहन करावा लागतो. त्यांना धुसपुस केली जाते. एआरटी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने यात लक्ष घालायला हवे.
२) बऱ्याच ठिकाणी एचआयव्ही समुपदेशन योग्य आणि चांगल्या पद्धतीने केलं जात नसल्याचं आमच्या लक्षात आलं. समुपदेशनासाठी एचआयव्हीसहित जगणाऱ्या व्यक्तींना नोकरी दिली तर त्यांच्या हाताला काम मिळेलच याशिवाय रुग्णांचा विश्वास संपादन करण्यातही ते यशस्वी ठरतील.
३) घरात आणि समाजात वावरताना त्यांच्याशी भेदभाव झाल्याचा घटना एचआयव्हीसहित जगणाऱ्या बांधवांकडून ऐकावयास मिळाल्या, संबंधीत लोकांचे व्यवस्थित मार्गदर्शन, माहिती प्रचारप्रसार आणि समुपदेशन करणे अत्यावश्यक आहे.
४) सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष सादरीकरणातुन एचआयव्हीबाबत चुकीची माहिती समाजापर्यंत पोहचवल्या जात आहेत, यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे.
५) बऱ्याच सामाजिक संस्था पब्लिसिटीसाठी फोटोज, व्हिडीओज, नाव सोशली करून मुलांचं करियर धोक्यात आणतात, याकडे संस्थाचालकांनी लक्ष घालावे.
६) अनेक वेळा एआरटीचा तुटवडा भासतो, तो सरकारने भरून काढावा.
७) मासिक पाळी, गरोदरपणात आणि बाळाला दूध पाजताना अशा संवेदनशील परंतु महत्वाच्या गोष्टींमध्ये घ्यावयाची काळजी स्त्रियांना दिली जावी.
८) लैंगिक शिक्षणाचा प्रचार प्रसार शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर व्हायला हवा.

या कार्यक्रमात अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्वत:ला झोकून दिले आहे. डॉ. विनय कुलकर्णी यांची प्रयास (पुणे), दत्ता बारगजे यांची ईन्फंट इंडिया (बीड), डॉ. गिरीश कुलकर्णी यांची हिम्मतग्राम (स्नेहालय, अहमदनगर), विहान (नेटवर्क ऑफ कोल्हापूर पिपल्स लिव्हिंग वीथ एचआयव्ही एड्स व दिलासा, कोल्हापूर), आदिल शेख (पुणतांबा ग्रामीण आरोग्य केंद्र) अशा अनेक संस्था नेहमीच एचआयव्हीविषयी जनजागृती, पीडितांना मार्गदर्शन आणि त्यांची काळजी घेणं, त्यांचं निवासी संगोपण करणं किंवा त्यांच्या हाताला काम देणं अशी मूलभूत कर्तव्ये पार पाडत आहेत.

भारत सोडून इतर देशांत एचआयव्हीला इतर रोगांप्रमाणेच एक सामान्य रोग म्हणून पाहिलं जातं. आपल्या समाजाचीसुद्धा कर्तव्ये आहेत की आपणसुद्धा एचआयव्हीसहित जगणाऱ्या व्यक्तींना जवळ करणे आणि त्यांना आपलंसं करून घेण्याची.

दरवर्षी प्रयासमध्ये डॉ. मोहन देस, डॉ. संजीवनी कुलकर्णी, अश्विनी देवणे, श्रुती भिडे, माणिक पारधे, सचिन गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते पाच दिवसीय कार्यशाळा घेतली जाते. ज्यामध्ये महाराष्ट्रातून एचआयव्हीसहित जगणारे अनेक मुलेमुली भाग घेतात. त्यांचं समुपदेशन आणि आरोग्याबद्दलचं शिक्षण त्यांना दिलं जातं.

चला तर मग, ह्या जागतिक एड्सदिनानिमित्त (१ डिसेंबर) आपण सर्वजण आपल्यातील समाजभान जागे करून संकल्प करूया की समाजात एचआयव्ही आणि एड्सविषयी जनजागृती करू आणि एचआयव्हीसहित जगणाऱ्या व्यक्तींना मायेचा आधार देऊया आणि म्हणूया होय, आम्हीसुद्धा एचआयव्हीबद्दल बोलतोय…!

– प्रकाश मानव, कोल्हार.
 

Leave A Reply

Your email address will not be published.