नवी दिल्ली – दिल्ली न्यायालयाने बुधवारी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवादी फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर मलिकची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षेपूर्वीच मलिकवर तिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी तिहार प्रशासनाकडून यासीन मलिकला कडेकोट बंदोबस्तात इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मलिकला सुरक्षेच्या दृष्टीने तुरुंगात कोणतेही काम देण्यात आलेले नाही. त्याला 7 क्रमांकाच्या कारागृहात ठेवण्यात आले असून त्याच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, मलिक दहशतवादी निधीसाठी दोषी असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल रजेचा हक्क मिळणार नाही.
यासीनने दिली गुन्ह्याची कबुली-
बुधवारी न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मलिकला फाशीची शिक्षा देण्याची राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. पटियाला हाऊस येथील विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी दिलेल्या निकालात यासिनला दोन कलमांत जन्मठेपेची, एका कलमात 10 वर्षे आणि एका कलमात पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्याला दंडही ठोठावला. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षा एकाचवेळी चालणार आहेत. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, दोषीने स्वत: त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याचे कोणतेही कारण नाही.