गढवाल – उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील पौरी तहसीलमधील चामी गावाजवळ पडलेल्या दरडींमुळे यमुनोत्री महामार्ग क्रमांक 123 शनिवारी ठप्प झाला. वायव्य हिमालयीन प्रदेशात मान्सूनचा प्रकोप अजूनही सुरूच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य वाहने अडकून पडली आहेत.
उत्तरकाशीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाचा जेसीबी घटनास्थळी रवाना झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अडकली आहेत. तसेच बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गही पागल नाला, पिपलोटीजवळ अनेक ठिकाणी ढिगारा पडल्याने ठप्प झाला होता.
सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पूर बचाव कार्य पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्लीच्या पूरग्रस्त भागात सुरू आहे. राज्य प्रशासनाच्या समन्वयाने बचाव आणि मदत कार्यासाठी पूरग्रस्त राज्यांमध्ये 58 एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफच्या 16 टीम दिल्लीत, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 11 टीम आणि पंजाब आणि हरियाणामध्ये 10 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत, एनडीआरएफच्या पथकांनी 1423 लोकांना दुर्गम भागातून वाचवले आहे आणि 4404 लोकांना दिल्लीत सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.