नवी दिल्ली -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर येत्या 15 जूनपर्यंत जरी आंदलोन स्थगित केले असले तरीही आम्ही आमच्या प्रमुख मागण्यांवर ठाम आहोत, असे परखड मत कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटले आहे. तसेच या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन सुरू करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. सात महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. यासंदर्भात राजधानी दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंबरोबरच अनेक पुरुष कुस्तीपटू, प्रशिक्षकही सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले. या कुस्तीपटूंना देशातून आणि परदेशातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये तब्बल सहा तास झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्याचे समोर आले होते. मात्र, ज्या पाच पप्रमुख मागण्या या कुस्तीपटूंनी ठेवल्या आहेत, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आणखी कठोर आंदोलन सुरू करू असे इशाराही या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा दिला आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबतचा तपास पूर्ण करून 15 जूनपर्यंत चार्जशीट दाखल केली जावी, भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जूनपर्यंत घेतली जावी, कुस्ती महासंघाची अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली जावी, समितीच्या अध्यक्षपदी महिला असावी,
निवडणूक होईपर्यंत आयओएच्या ऍड हॉक कमिटीवर दोन प्रशिक्षकांची नियुक्ती केली जावी, निवडणुका होतील तेव्हा त्यावर चांगले पदाधिकारी निवडून यावेत यासाठी खेळाडूंशी चर्चा केली जावी, माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या तीन टर्म पूर्ण झाल्या असून ते स्वत: किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती निवडून येऊ नये अशा कुस्तीपटूंच्या प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
आश्वासनांची पूर्तता करा अन्यथा….
सरकारने आम्हाला 15 जूनपर्यंत या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्हीही आमच्याविरोधातील गुन्हे मागे घेतले जावेत, अशी विनंती केली, ती सरकारने मान्य केली आहे. जर 15 जूनपर्यंत यासंदर्भात कार्यवाही केली गेली नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू, अशी प्रतिक्रिया कुस्तीपटू बजरंग पुनियाने दिली आहे.