नवी दिल्ली – कॉंग्रेसने शुक्रवारी गुजरातसाठी नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली. त्यानुसार, गुजरात कॉंग्रेसची सुत्रे खासदार शक्तिसिंह गोहील यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. गुजरातमध्ये मागील वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भाजपने सत्ता राखली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर गुजरातची सत्ता हस्तगत करण्याचे कॉंग्रेसचे स्वप्न भंगले.
एवढेच नव्हे तर, कॉंग्रेसची त्या राज्यातील आजवरची नीचांकी कामगिरी नोंदली गेली. त्या नामुष्कीजनक पीछेहाटीनंतर पक्षाचे नेते जगदीश ठाकोर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर गुजरात कॉंग्रेसची सुत्रे सोपवण्यात आलेले गोहील राज्यसभा सदस्य आहेत.
ते कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभरापेक्षा कमी अवधी शिल्लक आहे. ती बाब विचारात घेऊन कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. मोदी मुख्यमंत्री असताना गोहील गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.