नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) काही दिवसांत सुरू होणार आहे. स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशातच महिला प्रीमियर लीगसाठी(डब्लूपीएल) रविवारी येथील अरूण जेटली मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे तुल्यबळ संघ आपल्या पहिल्याच विजेतेपदासाठी भिडणार आहेत.
मेग लेनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्लीने पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहून थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. तर, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीने दुसऱ्या क्रमांकाच्या मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरमध्ये पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदासाठीचा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. या अंतिम सामन्यातून गेल्या १६ वर्षांत आरसीबी पुरुष संघ जो आयपीएल करंडक जिंकण्याचा परक्रम करू शकलेला नाही तो मानधनाच्या नेतृत्वाखालील महिला संघ करेल अशी अशा बंगळुरू चाहत्यांना आहे.
आरसीबी आणि दिल्ली यांच्यातील विजेतेपदाचा सामना पाहणे खूपच मनोरंजक असेल. कारण, एका बाजूला या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा मोठा चाहता वर्ग असेल. लीग टप्प्यात दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकले होते, तर आरसीबीला 8 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले.
आरसीबीचा या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा विक्रम अजिबात चांगला राहिलेला नाही. या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या मोसमातील पहिल्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 25 धावांनी विजय मिळवला. यानंतर दुसऱ्या साखळी सामन्यात दिल्लीने आरसीबीचा 1 धावेने पराभव केला. अशा स्थितीत अंतिम फेरीत दिल्लीचे आव्हान आरसीबीसाठी नक्कीच सोपे नसेल.
दिल्ली कॅपिटल्सचे पाच संघ
दिल्ली कॅपिटल्सचे नाव ऐकल्यावर चाहत्यांच्या मनात ऋषभ पंतचा कर्णधार असलेल्या आयपीएल संघाचा विचार येतो, परंतु जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी-२० लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे एकूण पाच संघ सहभागी होतात. आयपीएल व्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीकडे दुबई कॅपिटल्स, एसए-२० मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्स, एमएलसीमध्ये सिएटल ऑर्कास आणि महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स महिला संघ आहेत. या पाच संघांनी आजपर्यंत त्यांच्या लीगमध्ये ट्रॉफी जिंकलेली नाही.
आरसीबीकडेही दोन संघ आहेत
दुसरीकडे आरसीबीची अवस्थाही अशीच आहे. त्यांच्या फ्रँचायझीचे एकूण दोन संघ देखील टी-२० लीगमध्ये सहभागी होतात. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुरुष संघ आणि महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ. या दोन्ही फ्रँचायझींनी आजपर्यंत कधीही ट्रॉफी जिंकलेली नाही.
विजेत्यांवर होणार पैशांचा पाऊस
मुंबई इंडियन्स संघाला गत महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये विजेतेपदासाठी ६ कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला ३ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. मात्र, आतापर्यंत बीसीसीआयने डब्लूपीएलच्या बक्षीस रकमेबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. परंतू, रणजी करंडकातील भरघोस वाढीनंतर महिलांच्या लीगला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआय डब्लूपीएलच्या बक्षिस रकमेतही वाढ करू शकते.
संभाव्य संघ-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), आशा शोभना, दिशा कसाट, एलिस पेरी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, ऋचा घोष, श्रेयंका पाटील, सोफी डेव्हाईन, जॉर्जिया वेरेहम, केट क्रॉस, एकता बिश, एकता बिश सतीश, एस मेघना, सिमरन बहादूर, सोफी मॉलिनक्स.
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साहू , अँनाबेल सदरलँड, अपर्णा मंडल, अश्वनी कुमारी.