नवी दिल्ली – महिला प्रीमियर लीगचा (डब्लूपीएल) दुसरा हंगाम बंगळुरू आणि दिल्ली येथे खेळवला जाऊ शकतो. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर लीग स्टेजचे सामने आयोजित करण्याची योजना आहे. तर प्लेऑफचे सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होऊ शकतात.
– चिन्नास्वामीवर लीग स्टेज,
– अरुण जेटली स्टेडियमवर प्लेऑफ
– २२ फेब्रुवारीपासून स्पर्धा शक्य
ही स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १७ मार्चपर्यंत सुरू राहू शकते. स्पर्धेचा पहिला हंगाम २०२३ मध्ये खेळला गेला होता, तो मुंबई इंडियन्स महिलांनी जिंकला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) डब्लूपीएलच्या दुसऱ्या सत्राचे कारवाँ मॉडेलमध्ये आयोजन करण्याची योजना आखत आहे. कारवाँ मॉडेलमध्ये, २० लीग टप्प्यातील सामने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफमध्ये पात्र ठरलेले संघ दिल्लीला जातील. जेथे एलिमिनेटर आणि अंतिम सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.
बीसीसीआयने महाराष्ट्र आणि गुजरातसाठी दोन पर्याय दिले होते. पण सीझन १ चे सर्व सामने मुंबईत खेळवले गेले, त्यामुळे यावेळी तिथे आयोजन केले जात नाही. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता स्पर्धेसाठी खूप जास्त असते. त्यामुळे बीसीसीआयने हे दोन्ही स्टेडियम वगळले आणि शेवटी दिल्ली आणि बंगळुरूवर सहमती दर्शवली. मात्र, बीसीसीआयने अद्याप ठिकाण निश्चित केलेले नाही.
#FIHOlympicQualifiers2024 : ‘करो या मरो’च्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर शानदार विजय….
आयपीएलपूर्वी स्पर्धा संपवायची आहे
यावेळीही बीसीसीआयला डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम आयपीएलपूर्वी संपवायचा आहे. कारण दोन्ही स्पर्धा एकत्र आयोजित करताना मैदान आणि व्यवस्थापनात अडचणी येतील. भारतात लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलच्या तारखा ठरलेल्या नाहीत. त्यामुळे डब्ल्यूपीएलच्या तारखाही अद्याप ठरलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलही कारवाँ मॉडेलमध्ये होऊ शकते, असे मानले जात आहे. २०२० आणि २०२२ मध्ये करोनाच्या काळात कारवाँ मॉडेलमध्येही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.