नवी दिल्ली :- भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील अहमदाबादच्या सामन्याच्या वेळापत्रकात बदल झाल्यावर आता पाकिस्तानच्या आणखी एका सामन्याच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हैदराबाद क्रिकेट संघटनेने बीसीसीआयकडे ही मागणी केली आहे.
पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना 28 ऐवजी 29 सप्टेंबरला घेण्यात यावा असे संघटनेने म्हटले आहे. 28 तारखेला गणेश विसर्जन तसेच ईद ए मिलाद असल्याने सुरक्षा यंत्रणेवर ताण येणार असल्याने हा सामना 29 तारखेला खेळवला जावा असे आपल्या मागणीत संघटनेने म्हटले आहे.
वेळापत्रकात बदल करण्याची हैदराबाद संघटनेची ही दुसरी मागणी आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या 10 व 11 ऑक्टोबर रोजी सामने होणार होते. मात्र, त्यात बदल करण्यात आला असून आता हे सामने 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी होणार आहेत.
9 ऑक्टोबरला न्यूझीलंड व नेदरलॅंड्स हा सामना होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी याच मैदानावर पाकिस्तान व श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. सलग दोन दिवस दोन आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करणे शक्य होणार नसल्याचे संघटनेने बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.