रेडिओची जागा घेतली स्मार्टफोनने
पुणे – सकाळी पहिल्या बातम्यांपासून ते रात्री जुन्या हिंदी चित्रपट गाण्यांच्या प्रक्षेपणापर्यंत विविध विषयांची माहिती, वेगवेगळ्या प्रकारांतील गीतांचा खजिना असणारा रेडिओ आज घरोघरी दिसत नाही. काही दशकांपूर्वी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेडिओची जागा टीव्ही आणि स्मार्टफोनने घेतली असली तरी आजही तरुणाईला रेडिओची भुरळ कायम असल्याचे चित्र आहे. “जागतिक रेडिओ डे’च्या निमित्ताने याचा घेतलेला आढावा.
“जागतिक रेडिओ दिन’ 13 फेब्रुवारी 2012 पासून साजरा करण्यात येतो. 2011 साली युनेस्कोच्या 36 व्या सत्रात “जागतिक रेडिओ डे’ची घोषणा केली होती. यानिमित्त इटलीत सर्वप्रथम सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला होता. सुमारे 60च्या दशकानंतर माहिती आणि मनोरंजनाचा खजिना असणारे रेडिओ घरोघरी दिसू लागले.
बातम्या, मनोरंजनाचे कार्यक्रम, विविध विषयांवर चर्चा सत्रे, विविध संगीत प्रकार आदी कार्यक्रम लहाग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच भूरळ घालत. रेडिओमध्ये कालांतराने यात बदल होत गेले. कम्युनिटी रेडिओचा उद्य झाला. पारंपरिक वाहिन्यांबरोबरच अनेक खासगी रेडिओ स्टेशन्स सुरू झाली. रेडिओ यंत्रांमध्ये आधुनिकता दिसू लागली. अत्याधुनिक रेडिओ बाजारात आले. त्यानंतरच्या काळात याची जागा टीव्हीने घेतली. मात्र आजही प्रवास करताना रेडिओवर गाणी ऐकणे हे समीकरण कायम आहे.
एका ठिकाणाहून कामानिमित्त प्रवास करताना किंवा सहलीवेळी आजही हेडफोन्सचा वापर करून तरुणाई रेडिओवर गाणी ऐकते. इतकेच नव्हे तर, खासगी रेडिओ वाहिन्यांमुळे विविध स्पर्धा, कार्यक्रमांतून तरुणाईचा सहभाग वाढला असून, श्रोत्यांनाही “कनेक्टेड’ ठेवणारे हे माध्यम आहे. त्यामुळे “रेडिओ आता फारसा ऐकला जात नाही’ या प्रकारच्या वाक्यांना तरुणाईकडून छेद देण्यात येत आला आहे.
तरुणाई सांगते…
कार चालवताना रेडिओ लावणे आणि कोणाचाही त्यावर कोणते गाणे लावायचे याचा “कंट्रोल’ नसणे, ही बाब मला खूप आवडते. प्रवासात आपल्या आवडीचे पण अनेक वर्षांत न ऐकलेले गाणे “आर.जे’ने लावल्यानंतरची मजा काही औरच असते. रेडिओ माध्यमात कधीकाळी काम केल्याने, जाहिरातींमधील आवाज ओळखता येतात. नंतर कोणाची कोणती जाहीरात ऐकली, हेदेखील मी त्यांना कळवतो. माझ्यासाठी रेडिओ म्हणजे वैयक्तिक जगात हवा असणारा “परफेक्ट रॅन्डमनेस’च आहे.
– आदित्य महाजन
काही बाबींचा प्रत्येकाने अनुभव घ्यावाच, अशा ठराविक बाबींमध्ये रेडिओचा समावेश होतो. कायमच नव्या पिढीला उत्साह आणि ऊर्जा रेडिओच्या माध्यमातून मिळते. रेडिओमधून ऐकू येणारा आवाज, गाणी, भावना आदींमुळे वेगळाच उत्साह मिळतो. याशिवाय श्रोता “अपडेट’ राहतो. त्यामुळे कोणत्याही बंधनाशिवाय कायमच “फ्रेश’ ठेवणारे रेडिओ हे वैशिष्टपूर्ण माध्यम आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
– केतकी उत्पात