मुंबई – भारतात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक आयसीसीने आज (मंगळवारी) जाहीर केले. गतविजेता इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात येत्या 5 ऑक्टोबरला सलामीचा सामना अहमदाबादमध्ये रंगणार असून यजमान भारताचा सलामीचा सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होणार आहे.
या स्पर्धेला 100 दिवस बाकी असून आयसीसी व बीसीसीआयने स्पर्धेचे काउंटडाऊनही सुरु झाले आहे. यंदाच्या स्पर्धेत 10 संघांमध्ये 48 सामने खेळले जाणार आहेत. यजमान भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धेसाठी यापूर्वीच पात्र झाले असून उर्वरित दोन संघ सध्या झिम्बाब्वेत सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील.
पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलॅंड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती व यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेचा सलामीचा सामना अहमदाबादमध्ये गतविजेता इंग्लंड आणि गतउपविजेता न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आपली मोहिम ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये होत असलेल्या सामन्याने सुरू करेल.
Looking forward for an exciting @ICC #CWC2023 as Dharamshala @himachalcricket gets the opportunity to host this prestigious tournament for the first time ever in World’s most beautiful stadium and finals at World’s biggest #narendramodistadium @BCCI @ianuragthakur https://t.co/FAUspGJ8Jl
— Thakur Arun Singh (@ThakurArunS) June 27, 2023
पाकविरुद्ध अहमदाबादलाच रंगणार सामना
या स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात येत्या 15 ऑक्टोबरला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लढत होणार आहे. यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना तसेच अंतिम सामनाही अहमदाबादमध्येच खेळला जाणार आहे.
उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे मुंबई व कोलकाता येथे होणार आहेत. जर पाकिस्तानचा संघ पहिल्या उपांत्य लढतीत दाखल झाला तर सामन्याचे ठीकाण मुंबईच राहणार की त्यात आयत्यावेळी बदल केला जाणार हे अद्याप आयसीसी व बीसीसीआयने जाहीर केलेले नाही.
भारताचे सामने पुढील प्रमाणे…
8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू