ICC Playing XI Of World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहेत. या संघात 6 भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारा कर्णधार पॅट कमिन्स या संघात नाही. आयसीसीने रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवले आहे.
2023 च्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा रचिन रवींद्रही या संघाचा भाग नाही. याशिवाय आपल्या स्फोटक फलंदाजीने जगाला प्रभावित करणाऱ्या हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनाही आयसीसीने आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
भारताच्या या 6 खेळाडूंना मिळाले स्थान…
प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या 6 भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे तर त्यात विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. संघात समावेश असलेल्या विराट कोहलीने या स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा केल्या. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 24 बळी घेतले. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसोबतच यष्टीमागेही चांगली कामगिरी केली.
भारतातील सहा, श्रीलंकेचा एक, न्यूझीलंडचा एक, दक्षिण आफ्रिकेचा एक आणि विजेतेपद विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंचा आयसीसीच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेचा दिलशान मदुशंका, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.
आफ्रिकेचा डी कॉक या स्पर्धेत सर्वाधिक 4 शतके झळकावणारा खेळाडू होता. याशिवाय डॅरिल मिशेलने 9 डावात 552 धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या अॅडम जम्पाने 23 आणि श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाने 21 विकेट घेतल्या आहेत
ICC ची 2023 विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट इलेव्हन-
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरिल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी.