धर्मशाला :– इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या येथील धर्मशाला मैदानावर जी टीका केली होती, ती निरर्थक असून केवळ कोणत्यातरी गोष्टीवर लक्ष वेधून घ्यायचाच हा प्रयत्न आहे. हे मैदान देशातील सर्वात सुंदर मैदान असून एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेटसाठी आदर्श अशीच येथील खेळपट्टी आहे. आऊटफिल्डमध्ये गवत राखलेले नसून त्यामुळे खेळाडूंना दुखापती होण्याचा धोका असल्याचे विधान बटलरने केले होते.
मात्र, बीसीसीआयने त्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. जीतक्या गवताची आवशक्यता असते तेवढे गवत राखण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मैदान तयार करण्याची जी काही कामे केली गेली त्यावेळी या मैदानाबाबत जास्त कटाक्षाने काळजी घेतली जात होती, कारण संध्याकाळी दव पडते व ते निर्णायक ठरते, त्याचा एकाच संघाला लाभ न होता दोन्ही संघांना समान लाभ व्हावा यासाठी पुरेपुर काळजी घेतली गेली, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.
दरम्यान, डेव्हीड मलानने फटकावलेले वादळी शतक, ज्यो रूटची उपयुक्त खेळी व गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशचा 137 धावांनी पराभव केला. डेव्हीड मलान हा सामन्याचा मानकरी ठरला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता . इंग्लंडने 50 षटकांत नऊ गडी गमावून 364 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 48.2 षटकांत सर्वबाद 227 धावांवर आटोपला.