संगमनेर – महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. सत्यजित तांबे यांनी पहिल्या दिवसाला सुरुवात करताना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. कॉंग्रेसमधल्या काही लोकांनी आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून, त्यांनी आम्हाला बदनाम करण्याचे काम चालवले आहे, असा आरोप करत याबाबत उद्या शनिवारी मी सविस्तर बोलणार असल्याची प्रतिक्रिया आ.तांबे यांनी दिली.
विधान परिषदेतील सर्वात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या सत्कारासाठी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसह राज्यभरातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आज मोठी गर्दी केली. इंदिरानगर येथील प्रभा निवासस्थानी सकाळपासूनच राज्यभरातील तरुण कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे उपस्थित होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे नवनिर्वाचित युवा आमदार सत्यजित तांबे यांनी स्व. भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन केले. याप्रसंगी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच त्यांच्या घरी संघटनांचे पदाधिकारी, युवक, महिला, टीडीएफ संघटना, लोकभारती या शिक्षक संघटनांसह सुमारे 105 विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आ. सत्यजित तांबे म्हणाले की, हा विजय नाशिक विभागातील पदवीधर मतदारांचा आहे. आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी मागील बारा वर्षांमध्ये केलेले काम, त्यांच्याशी सातत्याने केलेला संपर्क, विविध शाळांचे अनुदान, जुनी पेन्शन योजना, डॉक्टर, इंजिनिअर, निमशासकीय कर्मचारी, बेरोजगार या सर्वांच्या विविध प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा यातून जीवाभावाचे कार्यकर्ते जोडले गेले. तसेच निर्माण झालेला मोठा जिव्हाळ्याचा मित्रपरिवार या सर्वांनी मोठा पाठिंबा दिला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची शिकवण घेऊन आपण काम करत असून समाजकारणाचा वारसा यापुढील काळातही आपण जपणार आहोत. आ. तांबे यांनी सातत्याने केलेले काम आणि मतदारसंघाची बांधणी याला मतदारांनी मोठी पसंती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.