मुंबई : पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे डगमगली आहे. पाकमधील जनतेचे एक वेळच्या जेवणासाठी हालहाल होत आहेत. या ठिकाणच्या सामान्य नागरिकांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील कट्टरपंथीय संघटनेच्या नेत्याने पाकिस्तान सरकारला अजब सल्ला दिला आहे. त्या सल्ल्याची चर्चा आता जगभरात होताना पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानने जगातील विविध देशांसमोर मदतीसाठी हात पसरण्याऐवजी एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घेऊन जगाला धमकावले पाहिजे. असे केल्याने संपूर्ण जग पाकिस्तानच्या मागण्या मान्य करेल, असा सल्ला पाकिस्तानमधील कट्टरपंथी गट तेहरीक-ए-लबाइकचे नेते अमीर हाफिज साद हुसेन रिझवी याने पाकिस्तान सरकारला दिला आहे.
Instead of begging, Pakistan’s govt and army should take Quran in one hand and N-Bomb in other and threaten the world & see demands fulfilled: Pak radical group Tehreek-e-Labaaik Ameer Hafiz Saad Hussain Rizvi pic.twitter.com/J05bvAVFGH
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) February 3, 2023
रिझवी याने जाहीर भाषणातून हा सल्ला दिला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत रिझवी म्हणाले, “अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी लष्कर प्रमुखांना समोर करून पाकिस्तान सरकार जगभरात सगळीकडे भीक मागत आहे. कुणी भीक घालतंय, तर कुणी भीक देत नाहीये.
तसेच काही देश स्वत:चा फायदा बघत आहेत. पण तुम्ही जगाकडे भीक मागण्यासाठी का जात आहात? पाकिस्तान सरकार आणि लष्कराने उजव्या हातात कुराण आणि डाव्या हातात अणुबॉम्बचा बॉक्स घेऊन जगाला धमकावलं पाहिजे. त्यानंतर संपूर्ण जग तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील.” असा सल्ला रिझवी यांनी यावेळी दिला.