वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली येथील ट्रामा सेंटरच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. वाघोली येथील गायरान जमिन गट नं. १११९ व ११२३ मधील एकुण ३.५ एकर जागेमध्ये सिव्हिल हॉस्पीटल व ट्रामा सेंटर सुरु करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली शासन स्तरावर यासाठी प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सुरू होता. प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्यास एक विशेष बाब” म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर ट्रामा केअर युनिट करीता विहीत पध्दतीने जागा उपलब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.
मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन वाघोली येथील पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून आभार मानले आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघोली व परिसरामधील लोकांसाठी ट्रामा सेंटर सुरु होणार असल्याने निश्चितपणे वाघोलीसह पुर्व भागामधील २५ गावे व नगर महामार्गाद्वारे पुण्यामध्ये येणाऱ्या सर्वच रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे. राज्य शासनाने लोकहिताचा निर्णय घेतल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
– रामभाऊ दाभाडे (माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे)