खडकवासला – गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रोड रस्त्यावरील धायरी फाटा, वडगाव बु., नांदेड फाटा, धायरी गाव या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजय मगर, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आव्हाड, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संखे यांच्या समवेत संबंधित वाहतूक कोंडीची पाहणी केली व तातडीने या ठिकाणी कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या की, “वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांचे जीवन त्रासदायक बनले आहे, तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धायरी फाटा येथील सिग्नल नियमित करण्यात यावा. तसेच वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. धायरी फाटा येथील भाजी मंडई स्थलांतरित करावी, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुरळीत होईल. रिक्षासाठी स्वतंत्र स्टॅण्ड देण्यात यावे. उड्डाणपुलाच्या खाली बेशिस्त लागणाऱ्या वाहनांना काढण्यात यावे आणि त्यांना पुन्हा गाड्या लावून देऊ नये. या सोबतच वाहनचालकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील आणि वाहन चालकांची अडचण होणार नाही”.
उपायुक्त विजय मगर यांनी देखील आपण तात्काळ वरील प्रश्नांना लक्षात घालून येत्या १५ दिवसात वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार असल्याचे सांगीतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, राहुल पोकळे, निलेश चाकणकर, शरद दबडे, कुणाल पोकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.