पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारत हेल्मेट सक्तीचे सुतोवाच
पुणे : दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे महत्त्वाचे आहे. ते परिधान करणे आवश्यक आहे. त्याबाबत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय ट्रिपल सीट प्रवास, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहतूक नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.
तसेच पुण्यातील वाहतूक समस्या हे आमचे ‘ब्रेड ॲण्ड बटर’ असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आता पुण्यात दुचाकीस्वार चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अशा वक्तव्यानंतर मात्र शहरात हेल्मेट विरोधी संघटना आणि नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासह महिलांच्या सुरक्षिततेला पुणे पोलिसांकडून विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासोबत कायदा व सुव्यवस्था राखणे, बालकांची सुरक्षितता, सायबर आणि आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करावा, यासाठी आम्ही ठोस उपाययोजना राबविण्यात येण्याचे प्रतिपादन नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून त्यांनी गुरुवारी संध्याकाळी पदभार स्वीकारला.
अमितेशकुमार म्हणाले, पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. बेशिस्त वाहन चालकांसह नियमभंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासोबत महिला, मुली, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती अंमलबजावणी केली जाणार आहे. कोयता गॅंग, अल्पवयीन गुन्हेगारी, सराईत टोळ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाईचा बडगा कायम ठेवला जाणार आहे.
विशेषतः बेसिक पोलिसिंग करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी जे काही आम्हाला करावे लागेल त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. हेल्मेट संदर्भात अमितेश कुमार म्हणाले, हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. त्यासाठी आम्ही जगजगृती तसेच कायद्येशीर भुमिका घेऊन ते घालण्यास भाग पाडू. मात्र यासाठी आम्ही प्रथम अधिकाऱ्यांशी चर्चा करु.
-हेल्मेट असावं पण सक्ती नको-
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात नवनिर्वाचित पुणे पोलीस आयुक्तांनी पदभार घेताच पुणेकरांची नाराजगी ओढवून घेतली आहे. बाकी पुण्याचे सामाजिक सुरक्षितेचे प्रश्न जे आहेत त्यावर मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी मौन का बाळगलं?पुण्यात चालणारे बेकायदेशीर धंदे, वाढती गुन्हेगारी, रात्रभर चालणारे पब, पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरांमध्ये सर्रास विकणारा गुटखा ह्या विरोधात पुणे पोलीस आयुक्तांनी खरं आवाज उठवणे गरजेचे आहे – स्वप्नील नाईक (पतित पावन अध्यक्ष पुणे शहर)
…तर हेल्मेट विरोधासाठी आंदोलन करु
प्रत्येक पोलीस आयुक्त आल्यावर अशा प्रकारची घोषणा करतात. मुळात पोलिसांचे मुळ काम हे वाहतूक नियोजन आणि कोंडी सोडवणे तसेच गुन्हे नियंत्रीत करणे हे आहे. यामुळे पुणेकरांवर चौकाचौकात उभे राहून दंड आकरणे हे अयोग्य असून सामान्य नागरिकांना अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर निश्चींत आंदोलनास सुरवात होईल- संदीप खर्डेकर (पुणेकर हेल्मेट विरोधी कृती समिती)