रांजणगाव येथे भरोसा सेल कक्षाचे उद्घाटन
रांजणगाव गणपती – महिलांनी अन्याय सहन करू नये, तर अन्यायविरोधात लढा दिला पाहिजे. महिलांवर होत असलेल्या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी भरोसा सेल उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन दौंड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी केले.
रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर) येथील पोलीस ठाण्यांतर्गत भरोसा सेल कक्षाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या हस्ते व जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या वंदनाताई पोटे, शिरुर महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा शोभनाताई पाचंगे, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सुलभा नवले,कारेगावच्या माजी सरपंच पुष्पलता ओस्तवाल, सोनेसांगवीचे सरपंच दत्तात्रेय कदम आदीसह महिला, पोलीस पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत सूत्रसंचलन श्वेता ओस्तवाल. पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी आभार यांनी मानले.
तज्ज्ञ असणार उपलब्ध
रांजणगाव गणपती एमआयडीसी, शिक्रापूर व शिरूर या तीन पोलीस स्टेशनसाठी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भरोसा सेल असून पीडित महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी समुपदेशक, डॉक्टर वकील व मनोविकार तज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत.