लखनौ – हिजाब घातलेली महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल, असे वक्तव्य “एआयएमआयएम’ पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. कर्नाटकात शालेय मुलींनी हिजाब घालण्याच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या या प्रतिक्रियेचा एक व्हिडीओ ओवेसी यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.
“हिजाब घातलेल्या मुली डॉक्टर, कलेक्टर, मॅजीस्ट्रेट, बिजनेस वुमन होतील. एवढेच नव्हे तर एक दिवस हिजाब घातलेली महिला या देशाची पंतप्रधान देखील होईल. मात्र हा दिवस बघायला कदाचित मी जिवंत असणार नाही.’ असे ओवेसी म्हणाले.
कर्नाटकात हिजाब घातलेल्या एका मुलीला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही मुलगी धमकीला घाबरली नाही. तिला समर्थन देण्यासाठीच आपणही सरकारने दिलेली झेड सुरक्षा नाकारली असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.
ओवेसी यांच्या वाहनाच्या ताफ्यावर गोळीबाराची घटना अलीकडेच घडली होती. त्यानंतर सरकारने पुरवलेली झेड दर्जाची सुरक्षा ओवेसी यांनी नाकारली होती.