मुंबई : नवी मुंबईतील वाशीमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मृत महिलेचे वय ६५ वर्षे इतके होते. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरु होते. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
या महिलेवर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते, असे एका वृत्त वाहिनीने सांगितले.
दरम्यान, राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून प्रत्येकी एक असे दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे. बुधवारी एका दिवसात राज्यात १५ नवी प्रकरणे समोर आली होती. त्यात मुंबईतून ९, ठाण्यातून १ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील ५ रुग्णांचा समावेश होता.