- औंध उरो रुग्णालयाच्या आवारातील घटना
पिंपरी – पत्नीचे विवाहापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून पतीने आपल्या साथीदाराच्या मदतीने पत्नीच्या विवाहापूर्वीच्या प्रियकराचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या सुमारास सांगवीतील औध उरो रुग्णालयाच्या आवारात घडली.
सौरभ व्यंकट जाधव (वय 28, रा. औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत सौरभ याचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव (वय 24) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आयाज शेख (रा. शिवाजीनगर, पुणे) आणि सोन्या बाराथे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी आयाज याच्या पत्नीचे विवाहापूर्वी मयत तरुण सौरभ याच्यासोबत प्रेम संबंध होते. त्यानंतर आयाजचा त्या तरुणीसोबत विवाह झाला.
मात्र, विवाहापूर्वी असलेल्या प्रेम संबंधाचा राग आयाज याच्या मनात होता. त्या रागातून आयाज याने आपल्या साथीदाराच्या मदतीने सौरभ याला औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नेऊन कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केले. सौरभ याच्या कानावर, मानेवर तसेच हातावर गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.