बंगळूरू – कर्नाटकात एका प्रसिध्द मंदिरातील तीन पुजाऱ्यांची हत्या करण्याची खळबळजनक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे आणखी चार साथीदार अद्याप फरार आहेत. चोरीच्या उद्देशानेच हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती असून या चोरांनी आणखी एका मंदिरात चोरी केली असल्याचा संशय आहे.
आनंद, गणेश आणि प्रकाश ही हत्या झालेल्या पुजाऱ्यांची नावे आहेत. मंदिराच्या परिसरातच त्यांचे मृतदेह सापडले होते. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. मुख्यममंत्री येदुरप्पा यांनी यात लक्ष घालून तपासाचे आदेश दिले होते.
दरम्यान, मंड्या जिल्ह्याच्या मद्दुर बस स्थानकावर काही जण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या भागाला घेरले व संशयितांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी पोलिसांवर धारदार शस्त्राने वार केला. त्यात एक निरिक्षक जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात तीन चोर जखमी झाले. त्यांच्या पायांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
पडण्यात आलेल्या पाच जणांपैकी चार मंड्या जिल्ह्यातील तर एक आंध्र प्रदेशातील आहे. फरार चार आरोपीही मंड्या येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.