नगर – विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज वेगवेगळी राजकीय नाट्य घटत असतांना दुसरीकडे उमेदवारांनी प्रचारात चांगलाच जोर धरला आहे. आज महाविकास आघाडीच्या उमदेवार शुंभागी पाटील नगर शहरात आल्या असता कॉंग्रेसच्या एक पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या पाठिशी नगरची अज्ञात शक्ती असल्याचे वक्तव्य केल्याने या निवडणुकीतील सस्पेन्स पुन्हा एकदा वाढला आहे.
प्रचार सभेत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख म्हणाले की, शुभांगी पाटील यांच्या पाठिशी नगर जिल्यात अज्ञात शक्ती आहे. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित आहे. आता ही अज्ञात शक्ती कोण? यावरून आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील शनिवारी नगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी आयोजित बैठकीत देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व्यक्ती पूजेपेक्षा विचारधारेला व पक्षाच्या आदेशाला महत्त्व देतात. याशिवाय नगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती कार्यरत असते. या शक्ती निवडणूक निकालाला दिशा देतात. त्यामुळे नगर जिल्ह्यातून पाटील यांना निश्चितच आघाडी मिळेल.’
देशमुख यांच्या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागले आहेत. जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सर्वपक्षीय यंत्रणा नेहमीच चर्चेत असते.ही पूर्वीपासूनच यंत्रणा असल्याचे मानले जाते. विखे पाटील कोणत्याही पक्षात असले तरी ही सर्वपक्षीय यंत्रणा विखे पाटील यांना हवी असलेली कामगिरी करते, अशी चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी होत असते. सध्याच्या निवडणुकीतही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेकडे जसे लक्ष लागले आहे, तसेच त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी विखे पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
या बैठकीत बोलताना उमेदवार शुभांगी पाटील म्हणाल्या. मी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून उभी आहे. मागील अनेक वर्षे मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करीत आहे. आझाद मैदानावर दीडशेपेक्षा जास्त आंदोलनाचे नेतृत्व मी केले आहे. धनशक्तीच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता या निवडणुकीत इतिहास घडवावा,’ असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षा रेश्मा आठरे, अशोक दहिफळे उपस्थित होते.