नगर – विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. या निवडणुकीसाठी सत्यजिंत यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बहाळकर यांनी दिली. सत्यजित तांबे यांना उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. उमेदवार मतदार व संघटनांच्या भेटी घेत आहेत. संघटनांकडून पाठिंबा जाहीर केला जात आहे. राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे शहरातील महाराष्ट्र हायस्कूल येथे शुक्रवारी (दि.20) पार पडली. राज्य कार्यकारिणी अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बहाळकर होते. यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, हिरालाल पगडाल, जी. के. थोरात आदी उपस्थित होते. या बैठकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना टीडीएफतर्फे उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बहाळकर यांनी दिली.
हिरालाल पगडाल म्हणाले, की लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा व धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी संघटनेने सातत्याने काम केले आहे. सत्यजित तांबे याच विचाराने राज्यभर काम करत आहेत. म्हणून नाशिक पदवीधर निवडणुकीत राज्यातील टीडीएफ संघटना त्यांच्या पाठिशी आहे.