पुणे : राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे तर सरकारकडून त्यांची बाजू मांडण्याचा सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्याचेच उदाहरण आज पुण्यात पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयाला दुजोरा देत आम्ही सुपरमार्केटमध्ये वाईन विकतो दारू नाही असे, तसेच काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिले असे म्हणत देवेंद्र फडणवीस याना टोला यावेळी लगावला.
पुण्यात करोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,” “वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात. द्राक्ष, काजूपासून वाईन तयार होते. अशी अनेक फळं आहेत. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. काही देश पाण्याऐवजी वाईन पितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे”, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.
तसेच “शेवटी आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल वगैरे असं काही करणार नाही. सुविधा देणं वेगळं. मध्य प्रदेशनं घरपोच दारू पोहोचवण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यांचं त्यांना लखलाभ. आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी व्हिडीओ क्लिप वगैरे काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे”, असा देखील दावा अजित पवार यांनी यावेळी बोलताना केला.