मुंबई : राज्य सरकारने सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना यातून फायदा व्हावा तसेच, वाइन उद्योगास चालना मिळावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र या निर्णयाला राज्यातील भाजपा नेत्यांनी या निर्णयाला विरोध करत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी, “जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भीतीपोटी की ते परदेशात वाइन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. गावच्या गावे अंधारात लोटली गेली आहेत. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
“जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाइनलाच विक्रीची परवानगी असणार आहे आणि परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही हे तुम्ही नमूद करणार का? टक्केवारीसाठी वाइन ही दारू नव्हे असे संशोधन करणाऱ्यांचा मी निषेध करतो असे,” गोपीचंद पडळकर म्हणाले.
“शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खूप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत,” असे पडळकर यांनी स्पष्ट केले.