वादळी पावसाने नुकसान : घरांसाठी मिळणार अनुदान

जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत घर दुरुस्तीसाठी महिलांच्या नावे 50 हजार रुपये

पुणे – जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्या घरांची पडझड झाली किंवा पूर्णपणे घर पडलेल्या कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत घर दुरुस्तीसाठी महिलांच्या नावे 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच घरकुल योजनेतून घरे बांधून देण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 11) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जून्नर तालुुक्‍यातील शिंदेवाडी येथे गारपीट आणि अतिवृष्टीमुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर ओतूरमधील तेलंगणवस्ती येथे दोन घरे पडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. येथील बाधीत व्यक्तींच्या घरांची मोठ्या प्रमाणात हाणी झालेली असून त्यांच्या घरांची दुरूस्ती अथवा घरकुल योजनेमधून कामे मंजूर करण्याची मागणी शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके स्थायी समितीच्या बैठकीत केली. कालेगाव येथे भीषण आग लागली होती, त्यामध्ये चार घरे जळाली. याकडे सर्वाचे लक्ष वेधले.

जिल्ह्यातील अनेक भागात वळीवाच्या पावसाने तसेच वादळाने घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी छत कोसळून दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या कुटुंबीयांना तातडीची मदत मिळत नाही, म्हणून महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंतर्गत घर दुरुस्तीसाठी देण्यात येणारे 50 हजार रुपयांचे अनुदान अशा कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच घरकुल योजनेत पात्र असणाऱ्यांना यशवंत घरकुल योजनेतून घरे देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी सांगितले.

अपघातग्रस्त सर्वसाधारण संवर्ग कुटुंबासाठी प्रस्ताव मंजुर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांतर्गत बाधित कुुटुंबांना त्वरित प्रस्ताव मागवून घेऊन मंजुरी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बैठकीत भाजपचे नेते शरद बुट्टे पाटील रणजित शिवतरे यांनी सूचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.