नगर – ग्रंथपालांच्या विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबर चर्चा करू तसेच राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेही या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाईल, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले. ग्रंथपालांच्या विविध मागण्यांचे निवेदन खासदार विखे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष नामदेव पांढरकर, राज्य ग्रंथालय शिक्षक परिषदेचे संघटक उल्हास देव्हारे, सचिव विष्णु रंगा, सहसचिव पुंजाहरी दिघे, राजेंद्र टेकावडे, दिगंबर काळे, विलास सोनार उपस्थित होते.
शाळा तेथे पूर्णवेळ ग्रंथपाल मंजूर व्हावे, पूर्णवेळ ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी संख्येचे निकष 300 पर्यंत शिथील करुन इयत्ता पाचवीतील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरावी, ग्रंथपालांना शिक्षक दर्जा मिळावा, गेले 26-27 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या अर्धवेळ ग्रंथपालांना सेवाशर्तीचे लाभ व जुनी पेन्शन मिळावी, पदवीधर ग्रंथपालांना शासन निर्णय 2006 नुसार पदवीधर वेतनश्रेणी मिळावी आदी मागण्या केल्या आहेत.