पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता अतिआत्मविश्वासाने हातची घालवून बसलेल्या राष्ट्रवादीने पुढील सार्वत्रिक निवडणुकीची तयारी चालविली आहे. प्रभागात बाहुबली असलेल्या आणि आर्थिक सदृढ असलेल्या सदस्यांना आतापर्यंत स्थायीमध्ये संधी देणारे राष्ट्रवादीचे नेते पक्षातील गरीब नगरसेवकांना स्थायीत संधी देणार का? अशी चर्चा सध्या महापालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कालावधी येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे. यामध्ये 6 भाजपाचे तर दोन राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. गेल्या तीन वर्षांत राष्ट्रवादीकडून स्थायी समितीमध्ये संधी देताना पक्षीय पातळीवर निर्णय घेतले. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्यामुळे या नगरसेवकांना संधी दिली होती. मात्र, 2022 रोजी होणारी सार्वत्रिक निवडणूक ही एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकासह कार्यकर्त्यांना पक्षाकडून ताकद मिळणे अपेक्षित असताना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदापासून कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे पक्षामध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. उघडपणे अजित पवारांसमोर बोलण्याचे धाडस कोणी करत नसले तरी खासगीत मात्र या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे.
आता 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायीच्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रवादीकडे विरोधाभास असणाऱ्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. अत्यंत गरीब आणि अतिश्रीमंत नगरसेवकांमधून पक्ष संधी कोणाला देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिलांच्या जागी महिलांना संधी?
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन महिला नगरसेवक स्थायीतून बाहेर पडणार असल्यामुळे त्यांच्या जागी महिलांनाच संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पौर्णिमा सोनवणे आणि निकीता कदम या दोन नगरसेविकांना संधी देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या प्रभागातून होत आहे. तर राजू बनसोडे हे देखील स्थायीच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे या तिघांपैकी पक्ष संधी देणार की आयत्यावेळी बाहुबली नेताच स्थायीत जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इच्छुकांचे अर्ज मागविले
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कालावधी संपलेल्या नगरसेवकांच्या जागी नव्याने दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्थायी समितीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या सदस्यांचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी अर्ज मागविले आहेत. 15 फेब्रुवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन काटे यांच्याकडून करण्यात आले आहे.