अणे – गणपती उत्सव अवघ्या दोनच दिवसांवर आल्यामुळे झेंडूंच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात राजुरी, जाधववाडी, बोरी बुद्रूक, साळवाडी, शिरोली सुलतानपूर, भोरवाडी, वडगाव कांदळी या गावांमध्ये झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. दोनच दिवसांवर गणपती उत्सव आल्यामुळे या फुलांना मोठी मागणी असते; परंतु यावर्षी या फुलांना मागणी असून सुध्दा योग्य असा बाजारभाव मिळत नाही.
यावर्षी या परिसरात अतिशय कमी पाऊस झालेला असून पाण्याचा अतिशय कमी तुटवडा असताना देखील या परिसरातील शेतकऱ्यांनी योग्य असे पाण्याचे नियोजन करूनही झेंडूचे पीक घेतले आहे. सध्या मिळत असलेल्या बाजार भावाप्रमाणे झेंडूची तोडणीसुध्दा परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे. सध्या झेंडूला दहा ते पंधरा रुपये किलोमागे शेतकऱ्यांला मिळत आहे. ग्राहक तोच झेंडू व्यापाऱ्यांकडे विकत घ्यायला गेला एका किलोला पन्नास ते साठ रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी उपाशी, तर व्यापारी तुपाशी, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.