VIDEO: “डीईएस’मध्ये “प्रभात ग्रीन गणेशा 2019′ कार्यशाळा (भाग-१)

विद्यार्थ्यांना दिले शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण

पुणे – केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशविदेशांतील गणेशभक्त ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. तो गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मूर्ती असो वा सजावट करण्यासाठी प्रत्येक गणेशभक्ताची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आपली सजावट आणि आपला बाप्पा अधिकाधिक अप्रतिम दिसावा, यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. मात्र, गणेशोत्सव पर्यावरण पूरक नसेल, तर प्रदूषणामध्ये भर पडते. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी दै. “प्रभात’ने यंदा “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही शाडूच्या मूर्ती बनवण्याची कार्यशाळा दि. 30 ऑगस्टपर्यंत घेण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी टिळक रस्त्यावरील “डीईएस सेकंडरी स्कूल’मध्ये हा उपक्रम पार पडला.

पाहा फोटो : विद्यार्थ्यांनी मातीपासून घडवला बाप्पा!

यावेळी विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने शाडू मातीच्या विटेपासून गणेशाची मूर्ती कशी साकारायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दहापेक्षा अधिक शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असून या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून बांधकाम व्यवसायातील अग्रणी सिद्धीविनायक ग्रुप, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स आणि महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पुणे महापालिका यांचे सहकार्य लाभले आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे, नितीन ठाकरे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना शाडूची मूर्ती बनवण्याचे तंत्र शिकवत आहेत. या मोहिमेचे औपचारिक उद्‌घाटन मंगळवारी टिळक रस्त्यावरील “डीईएस सेकंडरी स्कूल’मध्ये झाले.

“प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मातीतून गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद घेतला. या शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती साकारली.

आमच्यासाठी अविस्मरणीय संधी
शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचा अनुभव अनोखा होता.एका विटेतून गणेशाची रेखीव मूर्ती तयार होऊ शकते, याचे प्रशिक्षण आम्हाला या निमित्ताने घेता आले. त्याचबरोबर “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या कार्यशाळेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळाले. आम्ही तयार केलेल्या या “बाप्पा’ची प्रतिष्ठापना यंदा आम्ही करणार आहोत. त्यामुळे ही संधी आमच्यासाठी अविस्मरणीय होती, अशी भावना सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली.

आमचा बाप्पा “स्पेशल’
आम्ही पहिल्यांदाच मूर्ती साकारण्याचा आनंद घेतला. हा अनुभव खूप छान होता. मातीच्या एका विटेतून साकारलेला आणि कोणतीही मूर्ती समोर न ठेवता साकारलेला हा बाप्पा आमच्यासाठी “स्पेशल’ आहे. यासाठी आम्ही खास सजावट करणार आहोत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या एक ते दोन दिवस आधी गणपतीचे घरी आगमन होते. मात्र यंदा आठवडाभर आधीच आम्ही तयार केलेले “बाप्पा’ घरी येणार आहे, याचा विशेष आनंद आहे, असे विद्यार्थी दै. “प्रभात’शी बोलताना म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.