जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यांची निवड जवळपास निश्चित असल्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी म्हणून अर्थात राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून नेता निवडीची बैठक आज जयपूर येथे झाली.
या बैठकीत गेहलोत समर्थक आमदारांनी पायलट यांना अप्रत्यक्ष विरोध दर्शवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 56 आमदारांनी सचिन पायलट यांच्याऐवजी गेहलोत गटातीलच आमदाराची मुख्यमंत्री म्हणून निवड केली जाण्याची मागणी केली आहे.
कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीच्या अगोदर गेहलोत समर्थक आमदारांची शांती धारिवाल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. गेहलोत या बैठकीला उपस्थित नव्हते. आपल्या म्हणजे गेहलोत गटातील एका व्यक्तीला मुख्यमंत्री केले जावे अशी मागणी या बैठकीत आणि नंतर पक्षाकडेही करण्यात आल्याचे समजते. अन्यथा आमदारकीचा राजीनामा देण्याचेही या आमदारांनी सूचित केल्याची बातमी आहे.
सचिन पायलट यांनी जेव्हा पक्षाच्या विरोधात बंड केले होते तेव्हा हे आमदार गेहलोत यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. पायलट यांची समजूत काढण्यात तेव्हा कॉंग्रेस नेतृत्वाला यश आले होते व पायलट यांनी माघारही घेतली होती. मात्र त्यावेळी पक्षाला साथ देणाऱ्या आमच्या गटातूनच आता नव्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली पाहिजे अशी या आमदारांची मागणी आहे. त्यामुळे सचिन पायलट यांची कोंडी झाल्याचे रात्रीचे चित्र होते.