हैदराबाद – सलामीवीर फलंदाज कॅमेरुन ग्रीनने केलेल्या वादळी अर्धशतकी खेळीनंतर अक्सर पटेल व यजुवेंद्र चहल यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची वाताहत झाली होती. मात्र, तळातील फलंदाज टीम डेव्हीड व डॅनियल सॅम्स यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या तिन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 186 अशी मोठी धावसंख्या उभारली.
Innings Break!
Australia post a total of 186/7 on the board.#TeamIndia chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard – https://t.co/g9kw53R9ay #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/8lRHeJFaJv
— BCCI (@BCCI) September 25, 2022
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. पहिल्या सामन्यात वादळी फलंदाजी केलेल्या कॅमेरुन ग्रीनने याही सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने कर्णधार ऍरन फिंचच्या साथीत संघाला 44 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर गोलंदाजीत केलेला बदल यशस्वी ठरला व फिरकी गोलंदाज अक्सर पटेल आणि यजुवेंद्र चहलने त्यांच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत त्यांच्या फलंदाजीची वाताहत केली.
एकवेळ 1 बाद 44 अशा स्थितीतून त्यांचा डाव 4 बाद 84 असा घरसला. फिंचसह स्टिव्हन स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी साफ निराशा केली. ग्रीनने दमदार अर्धशतकी खेळी करत 21 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या मात्र, तो बाद झाल्यावर त्यांची धावगती खालावली. धडाकेबाद फलंदाज मॅथ्यु वेडही अपयशी ठरला. त्यावेळी जोस इंग्लिसने 24 धावा करत टीम डेव्हिडला सुरेख साथ दिली. तो बाद झाल्यावर डेव्हीडने डॅनियल सॅम्ससह संघाचे दीडशतक फलकावर लावले. या जोडीने सातव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली.
डेव्हीडही अर्धशतकी खेळीनंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 54 धावांवर परतला. त्याने या खेळीत 27 चेंडूत 2 चौकार व 4 षटकार फटकावले. सॅम्सनेही आक्रमक खेळी करताना नाबाद 28 धावा केल्या. त्यात 1 चौकार व 2 षटकार फटकावले. भारताकडून अक्सर पटेलने 3 गडी बाद केले. यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली.
संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया – 20 षटकांत 7 बाद 186 धावा. (टीम डेव्हीड 54, कॅमेरुन ग्रीन 52, जोस इंग्लिस 24, डॅनियल सॅम्स नाबाद 28, अक्सर पटेल 3-33).