दुबई – भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने आपण लवकरच पूर्ण भरात गोलंदाजीला प्रारंभ करणार असल्याचे सांगितले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे टाळले होते. त्यामुळे आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून त्याला डच्चू देण्यात येणार असल्याचेही सांगितले जात होते.
पंड्या गेल्या काही काळापासून सुमार कामगिरी करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पाठीवर शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यानंतर तो सातत्याने सरस कामगिरी करण्यात अपयशी ठरतना दिसत आहे. तरीही त्याला आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तो सध्या अमिरातीत आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
या स्पर्धेतही त्याची कामगिरी फारशी सरस होताना दिसत नसल्याने तसेच त्याला अद्याप गोलंदाजी करणेही शक्य होत नसल्याने त्याचा विश्वकरंडक स्पर्धेस्ठीच्या संघातील समावेश रद्द करावा, असे मत अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केले होते. त्यावर पंड्याने लवकरच गोलंदाजीला सुरुवात करणार असल्याचा खुलासा केला आहे.
मी सराव सत्रात गोलंदाजी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि लवकरच पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करणार आहे, असे पंड्याने म्हटले आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात अफलातून फलंदाजी केल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असला तरीही संघाला तो अष्टपैलू म्हणूनच संघात हवा आहे तसेच त्याने गोलंदाजी करणेही आवश्यक असल्याने सध्या त्याच्यावर दडपण आले आहे.