कोलकाता – बिहारमधील सत्तारूढ जेडीयूमधून हकालपट्टी करण्यात आलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची तृणमूल कॉंग्रेसशी जवळीक वाढत आहे. त्यातून किशोर यांना तृणमूलकडून थेट राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने याआधीच किशोर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आता भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीयूबरोबरचे किशोर यांचे संबंध संपुष्टात आल्याने त्यांच्याशी नाते आणखी घट्ट करण्यासाठी तृणमूल प्रयत्नशील आहे. त्यातून किशोर यांना तृणमूलचे खासदार बनवण्याचा विचार पुढे आला आहे. लवकरच पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत किशोर यांना उमेदवारी देण्याचे संकेत तृणमूलच्या गोटातून मिळत आहेत.
केवळ निवडणूक रणनीतीसाठी राजकीय पक्षांना मदत करणारे किशोर जेडीयूच्या माध्यमातून खऱ्याअर्थी प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय झाले. मात्र, जेडीयूचे अध्यक्ष असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील टीका त्यांना भोवली. तसे असले तरी भाजपविरोधी भूमिकेमुळे किशोर यांच्यावर अधिक जबाबदारी सोपवण्याची तृणमूलची तयारी आहे. स्वत: किशोरही संसदीय राजकारण करण्यास उत्सुक असल्याचे समजते.