- गुन्हेगारांनाही पडताहेत परदेश वारीची स्वप्ने
पिंपरी – मोठमोठे घोटाळे करणारे अनेकजण परदेशात पळून गेल्याचे आपण वेळोवेळी पाहिले आहे. परंतु एखाद्यावर गुन्हा दाखल झाला तर मात्र त्यास पासपोर्ट मिळत नाही. गेल्या वर्षभरात पिंपरी- चिंचवड शहरातून एकूण 67 हजार 600 जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले. यातील दखलपात्र गुन्हा दाखल असलेल्या 70 जणांच्या पासपोर्टचे अर्ज पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांना पडलेले परदेशवारीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले नाही.
पासपोर्ट बनवून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये उद्योग आणि कामगार नगरीही अपवाद राहिलेली नाही. पिंपरी- चिंचवड आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी कार्यान्वित झाले. त्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये ऑटोक्लस्टर येथील इमारतीमध्ये पासपोर्ट विभाग सुरु केला. सप्टेंबर 2018ते डिसेंबर 2018 या दरम्यानच्या चार महिन्यांमध्ये तब्बल 23 हजार 328 जणांना पासपोर्ट मजूर करण्यात आला. जानेवारी 2019 डसेंबर 2019 वर्षभरात 67 हजार 530 जणांची पासपोर्ट विनंती मान्य करण्यात आली. आयुक्तालय सुरु झाल्यापासून तब्बल 90 हजार 858 जणांनी पासपोर्ट घेतल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.
परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने पासपोर्ट विभागावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षात आलेल्या अर्जाची छाननी करीत असताना एकूण 70 जणांवर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पासपोर्ट विभागाने या गुन्ह्यांची माहिती संबंधित विभागाला कळवून त्यांचे पासपोर्ट थांबविण्यात आले आहेत.
पासपोर्टसाठी अर्ज आल्यानंतर आमच्याकडून अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते. अर्जदारावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली जाते. राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यास त्याबाबत माहिती मागविली जाते. असे मागील वर्षात 70 जणांची पासपोर्ट विनंती अमान्य करण्यात आली आहे.
– सुनील पिंजण, पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभाग