थिरूवनंतपुरम – केरळातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मतदान प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजे 6 एप्रिल नंतर जाहीर करेल असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ए. के. ऍन्टोनी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की पक्षाने कोणालाही मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिलेले नाही.
निवडणुकीनंतर आम्ही या विषयी एकमताने निर्णय घेऊ. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत कॉंग्रेसचे नेते ओमान चंडी हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच पक्षाकडून मुख्यमंत्रीपद दिले जाईल असे सांगितले जात असतानाच्या पार्श्वभूमीवर ऍन्टोनी यांच्या वक्तव्याला महत्व दिले जात आहे.
केरळ साठी कॉंग्रेसने जी दहा जणांची इलेक्शन मॅनेजमेंट समिती स्थापन केली आहे त्याचे अध्यक्षपद ओमान चंडी यांच्याकडे आहे. तथापि गेली पाच वर्षे विधानसभेत रमेश चेन्नीथला यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ऍन्टोनी यांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे. पत्रकारांनी ऍन्टोनी यांना त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी सन 2004 सालीच निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झालो असून माझी 2022 ला राज्यसभेची मुदत संपल्यानंतर मी माझी संसदीय कारकिर्दीचीही त्यावेळी अखेर करणार आहे.