सुएझ (इजिप्त) – सुएझ कालव्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अडकून पडलेले भलेमोठे मालवाहू जहाज मोकळे करण्यात आज यश आले आहे. या जहाजाला सोडवण्याच्या कामात सक्रिय असलेल्या इंजिनिअरनी आज ही माहिती दिली. मात्र हे जहाज कधी मार्गस्थ होईल, या संदर्भातील अधिक तपशील देण्यात आलेला नाही. वाळूमध्ये अडकून राहिलेल्या या जहाजामुळे सुएझ कालव्यातून होणारी सागरी वाहतूक पूर्णपणे खंडीत झाली आहे.
सुएझ कालव्याच्या पूर्वेकडील किनाऱ्या जवळ “एव्हर गीव्हन’ हे जहाज वाळूमध्ये अडकलेले होते. मात्र ते अंशतः मोकळे झाले असल्याचे सागरी वाहतुकीशी संबंधित एका वेबसाईटने उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने म्हटले आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे जहाज वाळूतून बाहेर काढण्यास मदत झाली आहे. हे जहाज आता जलमार्गात सरळ झाले आहे. तिरके झालेले जहाज आता सरळ झाले आहे. आता ते प्रवाहाच्या मध्यावर आहे, असे या वेबसाइटने म्हटले आहे.
अडथळा हटवला असल्याने जहाजावरील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र अजूनही जहाजाला बाहेर काढण्याचे काम बाकी आहे. कदाचित 1-2 दिवसात जहाज मार्गस्थ होऊ शकेल. असे बोस्कालीस या कंपनीचे मुख्य कार्यकारी पीटर बर्डोवस्की यांनी सांगितले.
या जहाजामुळे इजिप्तला आतापर्यंत 95 दशलक्ष डॉलरचा महसूलाला मुकावे लागले आहे. हे जहाज आणखी काही दिवसात पूर्णपणे मोकळे केले जाईल. किमान 10 दिवसात या मार्गावरची सागरी वाहतूक पूर्ववत होईल, असा अंदाज आहे. जहाज अंशतः मोकळे होण्याबाबत इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दर दिवसाला 9 अब्ज डॉलरचा व्यवहार ठप्प…!
“एव्हर गीव्हन’ हे महाकाय जहाज गेल्या मंगळवारी वाळूमध्ये रुतून बसले आणि त्यामुळे सागरी वाहतुकीची कोंडी झाली. या सागरी वाहतूक कोंडीमुळे दर दिवसाला 9 अब्ज डॉलरचा व्यवहार ठप्प झाला. किमान 367 जहाजांचा मार्ग या महाकाय जहाजांमुळे रोखला गेला. ही जहाजे तेल आणि खाद्यपदार्थांची वाहतूक करत आहेत. करोनाच्या साथीमुळे अडचणीत आलेल्या देशांना या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे. या जहाजांनी सुएझ कालव्याचा मार्ग सोडून आफ्रिकेच्या दक्षिणेअक्डील टोकाजवळून केप ऑफ गुडहोपजवळच्या मार्गाने जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे या जहाजांचा प्रवास आणखी दोन आठवड्यांनी वाढला आहे. त्यामुळे इंधनावर हजारो डॉलरचा खर्च होणार आहे.