वॉशिंग्टन – परग्रहवासीय म्हणजेच एलियनबाबत जगात सर्वत्र नेहमीच चर्चा सुरू असते. आता शास्त्रज्ञांनी या विषयाला पुढील स्तरावर नेले असून परग्रहवासीयांच्या आगमनासाठी पृथ्वीने तयार राहायला हवे आणि त्यासाठी संपूर्ण नियोजन करावे असा सल्ला आता शास्त्रज्ञांनी दिला आहे.
परग्रहवासीय पृथ्वीवर कधी येतील याबाबत कोणतेही संकेत नसले तरी त्यासाठी तयारी करण्याची हीच वेळ असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. स्कॉटलंडमधील सेंट अँड्रयूज युनिव्हर्सिटीतील संशोधक याबाबत योजना तयार करत असून परग्रहवासीय पृथ्वीवर आल्यावर त्यांच्याशी कशा प्रकारे सामना करायचा याबाबतचे नियोजन या योजनेमध्ये तयार केले जाणार आहे.
जगभरातील सर्व शास्त्रज्ञांचे सहकार्य घेऊन परग्रहवासीयांशी कशा प्रकारे वर्तणूक ठेवायची याबाबत एक विशिष्ट प्रोटोकॉल तयार करायला हवा असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अनेक चित्रपटांमध्ये परग्रहवासीयांचे चित्रीकरण करण्यात आले असले तरी शास्त्रज्ञ मात्र परग्रहवासीयांच्या विषयाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघत असून एका वेगळ्या संस्कृतीचा अभ्यास या निमित्ताने केला जाऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. अवकाशातून पृथ्वीवर येणारे विविध प्रकारचे संदेश उडत्या तबकड्या या सर्व गोष्टींचा आता नव्याने अभ्यास करण्यात येणार आहे.