पुणे – एमपीएससी परीक्षेत दर्शना दत्ता पवार (रा. कोपरगाव, जि. नगर) उत्तीर्ण झाली होती. वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून एमपीएससी परीक्षेत ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. मात्र अचानक तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. दर्शना पवारच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दर्शनाच्या मृत्यू मागचे कारण देखील पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरेला पकडल्यानंतर पत्रकार परिषद घेत दर्शनाच्या मृत्यू बाबत खुलासा केला आहे. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी यावेळी दिली. तसेच दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपी राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचं होतं. दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याचे अंकित गोयल यांनी सांगितले. तसेच सखोल तपासासाठी वेळ मिळालेला नसल्यामुळे याबाबतची अधिक माहिती तपास पूर्ण झाल्यानंतर समोर येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राहुल हंडोरे नेमका कोण आहे ?
राहुल हंडोरे गेल्या काही वर्षांपासून अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याने अनेक परीक्षा देखील दिल्या आहेत. सध्या तो फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करून एका रूममध्ये राहत होता. राहुल आणि दर्शना लहानपणापासून एकमेकांना ओळखत असल्याचे देखील यावेळी पोलिसांनी सांगितले.