नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे दावे समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता या प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात येत आहे. त्यामुळे याच मुद्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका केली आहे. टीका करत असताना त्यांनी रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचे नाव का घ्यावसे वाटले, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा आणि आदित्य ठाकरे यांचा काही संबंध आहे का त्या दृष्टीने सीबीआयला आम्ही तपास करण्याची विनंती करणार आहोत असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे. आम्ही फक्त युवा नेता म्हणत असून आदित्य ठाकरेंचे नावच घेतले नाही. पहिल्या दिवसापासून आम्ही कोणत्याही युवा नेत्याचे नाव घेतले नव्हते. भाजपाच्या नेत्यांनीही युवा मंत्री असे म्हटले आहे. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. आता त्याच्यात आदित्य ठाकरे यांनाच आपण कॅबिनेट मंत्री आहे असं वाटत असल्याचे आश्चर्य आहे,असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख यांना स्पष्टीकरण द्यावसे का वाटले नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
अनिल परब यांनीच ट्विट करत 13 तारखेला पार्टी झाली असे सांगितले. अनिल परब यांना काय माहिती आहे याची चौकशी झालीच पाहिजे. संजय राऊत स्वत:च आदित्य ठाकरे यांचे नाव घेत असून आव्हान देत आहेत. आम्ही सोडून सगळे आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्यासाटी का आतूर झाले आहेत हे मलाच विचारायचे आहे. शिवसेनेचे नेते जाणुनबुजून सर्व करत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला.
तसेच कॉंग्रेसप्रमाणे शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद सुरु असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. शिवसेनेत जुन्या शिवसैनिकांवर अन्याय केला जात आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले जात असून त्यातून विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अनिल परब आणि संजय राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. इशाऱ्यावर राजकारण केलं जाऊ शकत नाही, नाव सिद्ध करु शकत नाही. माझ्याकडे जी माहिती आहे ती योग्य वेळी सीबीआयला हवी असेल, त्यांना गरज असेल, सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणत्याही टोकाला जाऊन मदत करण्यास आपण तयार आहोत. मागितल्यास माझ्याकडे असणारी माहिती देण्यास तयार आहे,असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.