दखल: पालकांचे मोबाइल “मुलां’कडे का असतात?

जयेश राणे

लहान मुलांच्या हातात मोबाइल देणारे त्यांचे पालकच असतात, त्यामुळे मुलांना मोबाइलची सवय लावण्यास त्यांचे पालकच जबाबदार ठरतात. त्यामुळे पालकांनी स्वतःहून मोबाइल मुलांच्या हातात देऊ नये हाच यावर उपाय ठरू शकतो.

मोबाइल सध्याच्या युगाची अत्यावश्‍यकता आहे. ज्या गोष्टी अत्यावश्‍यक असतात, त्यांना पुष्कळ मागणी असते. कारण त्यांचा उपयोग करणारे सर्वाधिक असतात. अन्य प्रगत देशांच्या तुलनेत भारतात मोबाइलचे आगमन तसे उशिरा झाले आहे. मोबाइलधारकांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. संपर्कासाठी हे एक उत्तम मध्यम आहे; मात्र याचा उपयोग योग्य, अयोग्य प्रकारे किती होत आहे? याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोकरी- व्यवसाय यांवरून घरी आल्यावर विशेषतः बालवाडी, प्राथमिक माध्यमात शिक्षण घेणारी मुले पालकांकडून त्यांचा मोबाइल घेतात. मूल शांत राहावे यासाठी पालकही निमूटपणे त्यांना मोबाइल देतात. त्यामध्ये त्याचा कितीवेळ व्यय होत आहे? याकडे कुणाचे लक्ष असते का? त्याला जे हवे ते दिल्याने तो शांत आहे. यातच समाधान मानले जाते; पण हे समाधान नसून हा धोका आहे. हे पालक केव्हा लक्षात घेणार? काही प्रसंगी असाही अनुभव येतो की संबंधितांना संपर्क केल्यावर, त्यांचा भ्रमणध्वनी त्यांच्या मुलाकडे असतो. मोबाइल आवश्‍यक व्यक्‍तीच्याच हातात असणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

मुलाने अनावश्‍यक गोष्टीसाठी हट्ट केल्यास, त्याला ती गोष्ट देऊ नये. यातच शहाणपण आहे. मुलाने टोकाचे पाऊल उचलून अयोग्य कृती करू नये. केवळ या भीतीमुळे मुलाचा हट्ट पुरवणारे पालकही आहेत. मुलांचे लक्ष अनावश्‍यक गोष्टींकडे आकर्षिले जाऊ नये, यासाठी बालपणापासूनच योग्य ते संस्कार करण्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. आजमितीस त्या संस्कारांचा विसर पडल्याने बालपणापासूनच त्यांना मोबाइल हाताळण्याची सवय जडली आहे. किंबहुना त्या सूत्राचा सखोल संस्कारच त्यांच्यावर झाला आहे.

मुलासाठी अनावश्‍यक असणारी ती गोष्ट पालकांसाठी आवश्‍यक आहे. असे असले तरी आपल्याकडून मोबाइलचा अनावश्‍यक उपयोग किती होतो? याकडे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. आपल्या हातात असणारी वस्तू काय आहे? हे त्या मुलाला ज्ञात नसते. त्यामुळे ती मिळवण्यासाठीही हट्ट केला जातो, तसेच घरामध्ये खेळणी असूनही मूल मोबाइलसाठी हट्ट करत असते. अशा वेळी मोबाइलसोडून अन्य वस्तू देण्याची सवय लावली पाहिजे. जेव्हा मोबाइल नव्हते तेव्हा पालक विविध वस्तू देऊन, गोष्टी सांगून, घराबाहेर फिरण्यास नेऊन मुलांचे मनोरंजन करत होते. तोच कित्ता आताही गिरवला पाहिजे.

काहीजणांना कानाच्या समस्या आहेत. आपल्याला हा शारीरिक त्रास आहे, हे माहीत असूनही अनावश्‍यक कारणांसाठी मोबाइलचा अति उपयोग केल्याने त्यांना होणारा कानाचा त्रास वयाच्या पंचवीशीतच बळावला आहे. कानातून पाणी येणे, पू येणे आदी त्रास त्यांना आता होत आहेत. कान हा अत्यंत नाजूक अवयव आहे. आजच्या मोबाइलच्या युगात कानाचे स्वास्थ्य टिकून राहाणे कठीण झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणाचे लक्ष आहे का? हा तर यक्ष प्रश्‍न आहे. कानाविषयी जन्मजात समस्या असणे आणि मोबाइलच्या अतिरेकामुळे ती समस्या निर्माण होणे यात पुष्कळ फरक आहे.

दारूचे व्यसन असणाऱ्या एखाद्या व्यसनी व्यक्‍तीने तिच्या प्राशनाने स्वतःचे यकृत खराब करून घेणे आणि दुसऱ्याने दारूचे व्यसन नसतानाही शरीराचा एक भाग (कान) खराब करून घेणे म्हणजे एकच झाले. थोडक्‍यात काय तर व्यसनी व्यक्‍ती तिच्या शरीराचा अवयव खराब होण्यास कारणीभूत ठरते. अजून काही वर्षांनी मोबाइलमुळे कान, मेंदू यांविषयीच्या तक्रारींत वाढ होण्याची शक्‍यता अधिक आहे. हा धोका सर्वांना माहीत आहे. पण आवश्‍यक तेवढाच उपयोग करण्याकडे आपले किती लक्ष आहे? हा प्रश्‍न आपणच आपल्याला विचारल्यावर त्याचे उत्तर मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)