सदाशिव पेठेतील वितरकास अटक
दीड कोटी रुपयांचा औषध साठा मुंबईतून जप्त
पुणे – करोना उपचारांत वापरल्या जाणाऱ्या औषधांचे नाव वापरून बनावट औषधी विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील एका औषध वितरकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सचा भागीदार प्रभाकर नामदेव पाटील (रा. कल्याणीनगर) याला अटक करण्यात आली. सोबतच मॅक्सरिलीफ हेल्थकेअर औषध कंपनीचा संचालक सुदीप मुखर्जी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत औषध निरीक्षक विवेक खेडेकर यांनी फिर्याद दिली आहे.
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात अंजी येथे मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनी असून, तेथे औषध निर्मिती केली जात असल्याचे भासवण्यात आले होते. या कंपनीच्या नावाने करोना संसर्गावरील उपचारांसाठी वापरली जाणारी फॅविपिराविर, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधांची निर्मिती केली जात असल्याचे औषधांवरील लेबलवर छापण्यात आले होते.
याबाबत मुंबई अन्न आणि औषध प्रशासनाने हिमाचलात विचारणा केली, तेव्हा मॅक्सरिलीफ हेल्थकेअर नावाच्या कंपनीला औषध निर्मितीचा परवाना नसल्याचे समोर आले. यावर पोलिसांनी 1 कोटी 54 लाख रुपयांची बनावट औषधे मुंबईत जप्त केली होती.
सुदीपकुमार मुखर्जी यालाही अटक करण्यात आली. तपासणीत या कंपनीकडून विनापरवाना वेगवेगळ्या प्रकारच्या पाच औषधांची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर राज्यातील सर्व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयांना याबाबतची माहिती देण्यात आली.
पुण्यातही “मार्केट’
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत कोरेगाव पार्क भागात या औषधांचे वितरण तसेच विपणन केले जात असल्याची माहिती मिळाली. ही औषधे सदाशिव पेठेतील उमेद फार्मा सेल्सच्या मदतीने पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्रीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. विश्रामबागचे पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.