पुण्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे आजपासून लसीकरण

53 केंद्रांवर 5,300 जणांना मिळणार लस
पुणे –
लसीकरणाच्या नवीन धोरणानुसार बुधवारपासून शहरात 18 वर्षांवरील नागरिकांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने 53 केंद्र निश्‍चित केली असून, या ठिकाणी 5,300 जणांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

शासनाने आखलेल्या नव्या लसीकरण धोरणानुसार पुणे मनपा हद्दीत लसीकरण सुरू करण्यात येत असून लसीकरणाची ही मोहीम व्यापकपणे राबवण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे, असे महापौरांनी यावेळी सांगितले.

महापौर म्हणाले, “18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण होणे, हा आपल्या पुणे शहरासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पुणे शहर लसीकरणाबाबतीत आघाडीवर तर आहेच, मात्र नव्या धोरणामुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल.

शहरातील 18 वर्षांवरील नागरिकांची संख्या आणि व्यापकता लक्षात घेऊन लसीकरणाचे नियोजन केले आहे’.पहिल्या दिवशी 53 केंद्रांवर लसीकरण करत असून प्रत्येक केंद्रांवर 100 कोविशील्ड लस उपलब्ध करुन दिल्या आहेत.

प्रत्येक केंद्रांवर 70 टक्के डोस हे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक केलेल्या नागरिकांना तर, 30 टक्के डोस हे ऑन दी स्पॉट नोंदणी करुन उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाइन नोंदणी बुधवारी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे’.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.