बेशिस्त पार्किंगला आळा कोण घालणार

– मुकुंद ढोबळे

शिरूर – पुणे महामार्गावर सर्व ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने कंटेनर पार्किंग केले असल्याने अनेकवेळा अपघाताला निमंत्रण मिळत आहे. परंतु याकडे या भागातील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

पुणे महामार्गावर अगोदरच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यात रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारेगाव व्हर्लफुल कंपनीसमोर एलजी कंपनीच्या बाजूला रांजणगाव गणपतीपर्यंत तर त्यापुढे कोंढापुरी, शिक्रापूरपर्यंत तसेच कोरेगाव भीमा, लोणीकंद, सणसवाडी, वाघोलीपर्यंत अनेक कंटेनर चालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करीत आहेत. ही वाहने रस्त्याला खेटूनच असल्याने अपघात घडलेले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अपघातात कायमचे जायबंदी झालेले आहेत.

कंटेनर चालकांना रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करू नये, यासाठी अद्याप पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले नाहीत. यामुळे कंटनेरचालकांची मनमानी दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेलाच कंटेनर पार्किंग वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मालाची ने- आण करण्यासाठी कंटेनर येतात. कारेगाव ते रांजणगाव गणपतीपर्यंत कंटेनर रस्त्याच्या कडेला पार्किंग केले जातात. तासन्‌तास कंटेनर रस्त्याच्या कडेला असल्याने रस्ताही अरुंद होत आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील पोलीस प्रशासन, शिक्रापूर पोलीस, लोणीकंद पोलिसांनी पार्किंग केलेल्या कंटेनरबाबत गांभीर्याने घेऊन कंटेनरचालकावर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.