‘द फॅमिली मॅन २’ वेब सिरीजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. वादाच्या भोवऱ्यात असलेली ही वेब सिरीज सुपरहिट झाली आहे. यामधील मनोज वाजपेयी आणि समंथा अक्किनेनीच्या ऍक्टिंगचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.
परंतु, यातच आणखी एका पात्राने दर्शकांचे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे चेल्लम सर. #chellamsir हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. चेल्लम सर यांची तुलना युझर्स थेट गुगल, विकिपीडिया आणि इनसायक्लोपीडिया यांच्याशी करत आहेत. चेल्लम सरांकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, असे युझर्सचे म्हणणे आहे. पण तुम्हाला माहितीये का कोण आहेत हे चेल्लम सर म्हणजेच उदय महेश? याचेच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
काय आहे ‘द फॅमिली मॅन २’मध्ये चेल्लम सरांची भूमिका?
‘द फॅमिली मॅन २’मध्२’ची कहाणीमध्ये पंतप्रधान मिसेज बासू आणि श्रीलंकेचे बंडखोर आहेत. या ग्रुपचे काही लोक चेन्नईचे असतात. या ग्रुपमध्ये समंथा असते. त्यांच्या निशाण्यावर भारताचे पंतप्रधान असतात. हा हल्ला रोखण्याची जबाबदारी श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयी आणि त्यांच्या टीमवर असते. वेब सिरीजमध्ये श्रीकांत तिवारीला जिथे अडते तिथे चेल्लम सरांची एंट्री होते. चेल्लम सर एक एक्स अंडरकव्हर एजंट आहेत. त्यांच्याजवळ बंडखोरांपासून शासकीय विभागापर्यंत सर्वांची उत्तरे आहेत. म्हणून श्रीकांत तिवारी जिथे अडखळतो तिथे तो चेल्लम सरांना फोन लावतो.
फक्त १५ मिनिटात फेमस झाले चेल्लम सर
‘द फॅमिली मॅन २’मध्ये एकूण ९ एपिसोड्स असून ते एका तासाचे आहेत. यामध्ये केवळ १५ मिनिटांचीच भूमिका चेल्लम सरांची आहे. त्यांच्या स्वतःचा असा वेगळा अंदाज आहे. ते अधिक सावधानता बाळगत असून प्रत्येक कॉलनंतर वेगळे सिम वापरत असतात. अनेकदा असे वाटते कि, गुप्त संस्थेपेक्षा चेल्लम सर एक पाऊल पुढे आहेत. बंडखोर पुढे काय करणार आहेत? ते कुठे भेटतील? या सगळ्यांची माहिती चेल्लम सरांकडे आहे.
कोण आहेत चेल्लम सर म्हणजेच उदय महेश?
उदय महेश दाक्षिणात्य चित्रपट आणि टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचे पूर्ण नाव उदयभानु महेश्वरन आहे. तामिळनाडूमध्ये जन्मलेले उदय महेश यांनी ‘नालई’ (२००६) आणि ‘चक्करा पियुगम’ (२००८) असे दोन चित्रपट दिग्दर्शित केले आहे. अभिनेता म्हणून ‘ऑफिस’ या टीव्ही शोमधून उदय महेश यांना प्रसिद्धी मिळाली होती. उदय महेश यांना सुरुवातीपासूनच क्राईम आणि थ्रिलरमध्ये रस आहे. त्यांचे दोन्ही चित्रपट क्राईम आणि थ्रिलरवरच आधारित आहेत.
उदय महेश यांनी २०१३ साली ‘मुदर कुदम’ चित्रपटामधून डेब्यू केला. त्यांनी आत्तापर्यंत २१ चित्रपट आणि चार टीव्ही सिरिअल्समध्ये काम केले आहे. तर मद्रास कॅफे, सिरियस मॅन या हिंदी चित्रपटांमध्येही उदय महेश झळकले आहेत. २०१६ साली रिलीज झालेल्या रजनीकांत यांच्या ‘कबाली’मध्ये उदय महेश यांनी छोटीशी भूमिका निभावली होती. ‘द फॅमिली मॅन २’मधील चेल्लम सरांच्या भूमिकेमुळे उदय महेश यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळाली.