तालुक्यातील चार जण इच्छुक; निर्णयाकडे लक्ष
यवत- विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक फरगडे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकीत ऐन वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. याच दरम्यान कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी दौंड तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून विठ्ठल खराडे यांची नियुक्ती केली होती. मात्र, आता विठ्ठल खराडे, विठ्ठल दोरगे, संपत फडके, नाना रंधवे हे अध्यक्ष पदासाठी इच्छुक असून तालुकाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याची कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.
दौंड तालुका अध्यक्ष म्हणून कॉंगेसची धुरा पोपटराव ताकवणे अनेक वर्षे सांभाळीत होते. र्त्यीांनी दौंडमध्ये कॉंग्रेस जीवंत ठेवण्याचे काम केले. त्यानंतर त्याच काळात दौंड कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून वरवंड येथील अशोक फरगडे यांची निवड करण्यात आली होती. परंतु, जेमतेम एक वर्षे पूर्ण होत नाही तोच फरगडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. तर याच काळात पोपटराव ताकवणे यांनी वरवंड येथील सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार संजय जगताप यांनी कॉंग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते विठ्ठल खराडे यांची तालुका प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. विधानसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस पक्षाला अनपेक्षित यश मिळाले असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामध्ये भाजपा-शिवसेना महायुतीमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या संघर्षात राष्ट्रपती राजवट लागली असून राज्यात नवीन समीकरणे उदयाला येत आहेत.
शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष या तीन पक्षाचे मिळून महाशिव आघाडीचे सरकार येण्याची शक्यता असल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत यासह आदी निवडणुका येणार असल्याने कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून संघटनात्मक बांधणी व पक्ष वाढीसाठी जोमाने काम करावे लागणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे पक्षश्रेष्ठी कोणाला तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देतात याची कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उच्छूकता लागली आहे.