प्रथमेश परब चढणार बोहल्यावर? ‘ढिशक्यांव’ चित्रपटात पहा त्याच्या लग्नसोहळ्याची धमाल प्रथमेशला लागलेत लग्नाचे डोहाळे, ‘ढिशक्यांव’ चित्रपटाने केले डोहाळे पूर्ण दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा ‘ढिशक्यांव’ चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ ला होणार प्रदर्शित अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. ‘आमचं ठरलं आहे,
लग्नाला यायचं हं… पत्रिका गुरुवारी पाठवतोय.’ असे म्हणत बोहल्यावर चढण्यास सज्ज झालेल्या प्रथमेशच्या या सोशल मीडियावरील पोस्टच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र हे ही तितकेच खरे आहे की प्रथमेश खऱ्या आयुष्यात नव्हे तर मोठ्या पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे.
विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित ‘ढिशक्यांव’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहता पोस्टर मध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून, नवरा बनून त्याच्या बायकोसोबत पाहायला मिळतोय मात्र या पोस्टरमध्ये गोंधळात पाडणारी बाजू म्हणजे प्रथमेशच्या बायकोच्या हातात बंदूक पाहायला मिळत असून ती बंदूक तिने प्रथमेशवर रोखून धरलेली आहे, तर प्रथमेश आणि अहेमदच्या गळयात हार पाहायला मिळतोय त्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे हे गुपित १० फेब्रुवारी २०२३ ला समोर येणार आहे.
दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्यांव” हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला असून चित्रपटाची प्रस्तुती एव्हीके एंटरटेनमेंट (AVK Entertainment), अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे.